पुणे प्रतिनिधी । मराठा समाजाला दिलेले एकही आश्वासन पूर्ण न केल्याचा आरोप करून आज मराठा क्रांती मोर्चाने भाजप व शिवसेनेवर बहिष्कार टाकण्याचे जाहीर केल्याने खळबळ उडाली आहे.
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर, पुणे येथे मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वय समितीची महत्वाची बैठक झाली. या बैठकीनंतर यातील निर्णयाबाबत पत्रकार परिषदेत माहिती देण्यात आली. भाजप – शिवसेनेने सातत्याने मराठा समाजाची फसवणूक केली आहे. दोन्ही पक्षांनी कोणतंही आश्वासन पूर्ण केलेलं नाही. आरक्षणाच्या नावाखाली समाजाची दिशाभूल केलीय. यामुळे दोन्ही पक्षांच्या उमेदवाराला मतदान करण्यात येणार नसल्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला आहे. राज्यात मराठा समाजाची संख्या ५ कोटींवर आहे. त्यामुळे ५ कोटी पत्रके छापून मराठा समाजाच्या प्रत्येक घरात मराठ्यांच्या फसवणुकीची कहाणी मांडणार असल्याची माहितीसुध्दा या पत्रकार परिषदेत देण्यात आली. याप्रसंगी मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक संजय सावंत, महेश डोंगरे, नानासाहेब जावळे आदी उपस्थित होते.