वॉशिंग्टन: : वृत्तसंस्था । अमेरिकेत जगभरातील सर्वाधिक कोरोना बाधित असून सर्वाधिक मृतांचीही नोंद करण्यात आली आहे.
अमेरिकेतील परिस्थिती चिघळत असल्याचे चित्र आहे. मागील एका आठवड्यात १० हजारांहून अधिक रोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. अमेरिकेत आतापर्यंत दोन लाख ७० हजारांहून अधिकजणांचा मृत्यू झाला आहे.
अमेरिकेत आतापर्यंत एक कोटी ३७ लाखांहून अधिकजणांना कोरोनाची बाधा झाली आहे. जॉन हॉपकिन्स विद्यापीठाच्यावतीने दिलेल्या माहितीनुसार, अमेरिकेत आतापर्यंत दोन लाख ७० हजार ४८१ जणांचा मृत्यू झाला आहे.
न्यूयॉर्क, न्यू जर्सी, टेक्सास आणि कॅलिफोर्निया राज्यात संसर्ग मोठ्या प्रमाणावर झाला आहे. न्यूयॉर्कमध्ये ३४ हजार ६६२ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर, न्यू जर्सीमध्ये आतापर्यंत १७ हजार जणांचा मृत्यू झाला आहे. टेक्सासमध्येही मृतांची संख्या २२ हजार ११४ वर पोहचली आहे. तर, फ्लोरिडामध्ये १८ हजार ६७९ जणांचा मृत्यू झाला आहे.
. फायजर आणि मॉडर्ना या दोन्ही कंपन्यांनी अमेरिका प्रशासनाकडे आपात्कालीन परिस्थितीत लस वापरासाठी परवानगी मागितली आहे. येत्या काही दिवसात अमेरिकेत लस उपलब्ध होण्याची शक्यता आहे. नाताळापर्यंत अमेरिकेत दोन लस उपलब्ध असतील, अशी चर्चा आहे.
२८ नोव्हेंबरपर्यंत जगभरात ६ कोटी २५ लाख ५४ हजार ८६४ जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. एक नोव्हेंबर ते २८ नोव्हेंबर दरम्यान एक कोटी ६१ लाखांहून अधिक बाधित आढळले. या २८ दिवसांत दररोज जवळपास ५.७५ लाख बाधित आढळले. ऑक्टोबर महिन्याच्या अखेरीस जगभरात ४ कोटी ६४ लाख ५४ हजार १५८ बाधितांची नोंद करण्यात आली. ऑक्टोबर महिन्यात एक कोटी १८ लाख बाधित आढळले होते. या महिन्यात दर दिवशी प्रति दिवस सरासरी ३.८१ लाख नवीन बाधितांची नोंद करण्यात आली.