पणजी वृत्तसंस्था । प्रमोद सावंत यांनी रात्री दोन वाजेच्या सुमारास गोव्याच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली असून त्यांच्यासोबत दोन उपमुख्यमंत्री असणार आहेत.
गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांचे निधन झाल्यानंतर काल सायंकाळी प्रमोद सावंत यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले होते. यानंतर रात्री उशिरा भाजप नेत्यांनी राजभवनमध्ये राज्यपाल मृदुला सिन्हा यांची भेट घेऊन सत्ता स्थापनेचा दावा केला. त्यानंतर राजभवनातच सावंत यांचा शपथविधी सोहळा पार पडला. रात्री १ वाजून ४५ मिनिटांनी प्रमोद सावंत यांचा शपथविधी झाला. यावेळी गोवा फॉरवर्ड पक्षाचे विजय सरदेसाई आणि महाराष्ट्रवादी गोमांतक पक्षाचे सुदीन ढवळीकर या दोघांनाही उपमुख्यमंत्रिपदाच्या पद आणि गोपनीयतेची शपथ देण्यात आली. याचवेळी ११ मंत्र्यांनी शपथ घेतली. यामध्ये मनोहर आजगावकर, रोहन खंवटे, गोविंद गावडे, विनोद पालयेकर, जयेश साळगांवकर, माविन गुदिन्हो, विश्वजित राणे, मिलिंद नाईक आणि निलेश कॅबरल यांचा समावेश आहे.