वैशाली-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | बिहार राज्यातून धक्कादायक बातमी समोर येत आहे. बिहारमधील वैशाली येथील सुलतानपूर गावात हाय-व्होल्टेज ओव्हरहेड वायरच्या संपर्कात आल्याने नऊ कावड यात्रेकरूंचा मृत्यू झाला तर अनेक जण जखमी झाले आहेत. दरम्यान, श्रावणातील तिस-या सोमवारी जलाभिषेक करण्यासाठी जाणा-या भाविकांच्या वाहनाला हाय टेंशन वायरचा धक्का लागला, या घटनेत ९ जणांचा मृत्यू झाला. हाजीपूर औद्योगिक पोलिस स्टेशन हद्दीतील सुलतानपूर येथे हा अपघात झाला. इथे श्रावण महिन्यात गावातील मुलं दर सोमवारी जवळच्या हरिहरनाथ मंदिरात जलाभिषेक करायला जात असतात.
रविवारी रात्री मुलं जलाभिषेकासाठी बाहेर पडली होती. या मुलांनी प्रवासासाठी ट्रॅक्टर-ट्रॉलीवर डीजेचीही व्यवस्था केली होती. या गावातील रस्ता खराब असल्याने ट्रॅक्टर ट्रॉलीचा रस्त्यावरून जाणा-या हाय टेंशन लाईनला धक्का लागला. विद्युत प्रवाहामुळे ट्रॉलीत बसलेल्या मुलांना विजेचा धक्का बसला. यामुळे ९ जणांचा जागीच मृत्यू झाला. या अपघाताची माहिती मिळताच पोलिस दाखल झाले. यावेळी स्थानिकांनी विद्युत विभागावर गंभीर आरोप केले. वीज विभागाचा निष्काळजीपणा अपघाताला कारणीभूत ठरल्याचा आरोप स्थानिकांनी केला असून अपघातानंतर सातत्याने माहिती देऊनही वीज विभागाने कोणतीही कारवाई केली नाही. पोलिस आणि प्रशासकीय अधिकारी आल्यानंतरही रात्री उशिरापर्यंत मृतदेह घटनास्थळीच होते.