स्वातंत्र्यदिनी फडकणार ७५ फूट उंचीवरील तिरंगा – आ. चंद्रकांत पाटील यांचा पाठपुरावा

मुक्ताईनगर लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त मुक्ताईनगर शहरातील प्रवर्तन चौकात ७५ फुटी राष्ट्र ध्वज स्तंभ उभारणीसाठी आमदार चंद्रकांत पाटील यांचा युद्ध पातळीवर पाठपुरावा सूरु आहे. यास परवानगी मिळावी यासाठी त्यांनी जिल्हाधिकारी डॉ.अभिजित राऊत यांचेकडे पत्रव्यवहार केला आहे.

भारतीय स्वातंत्र्याला ७५ वर्ष पूर्ण होत आहे. या गौरवशाली पर्वानिमित भारतीय स्वातंत्र्याचे ‘अमृत महोत्सवी वर्ष’ संपूर्ण देश साजरा करीत असून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून ‘हर घर तिरंगा’ हे अभियान राबविले जात आहे.

केंद्र शासनाच्या व राज्य शासनाच्या शासन परिपत्रकानुसार ‘हर घर तिरंगा’ अभियान राबविले जात असून प्रत्येक घरावर तिरंगा फडकाविणे याच आदेशाला अनुरूप मुक्ताईनगर शहरातील सौंदर्यात भर म्हणून तसेच जनतेच्या मनात या स्वातंत्र्य लढ्याच्या स्मृती तेवत रहाव्यात. स्वातंत्र्य संग्रामातील अज्ञात नायक / क्रांतिकारक / स्वातंत्र्य संग्रामात घडलेल्या विविध घटना यांचे स्मरण व्हावे. स्वातंत्र्यासाठी चेतविलेले स्फुलिंग कायम तेवत राहावे व देश भक्तीची ज्वाजल्य भावना कायम स्वरूपी जनमानसात रुजावी  या उद्देशाने या दैदिप्यमान इतिहासाचे अभिमान पूर्वक संस्मरण करण्यासाठी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत मुक्ताईनगर मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या प्रवर्तन चौकात सुमारे ७५ फुट उंचीचा राष्ट्र ध्वज स्तंभ उभारणीकरीता परवानगी मिळावी. यासाठी लागणारा निधी त्यांच्या स्थानिक विकास  आमदार निधीतून खर्च करण्याची त्यांची तयारी असून यासाठी त्यांनी जिल्हाधिकारी डॉ.अभिजित राऊत यांचेकडे पत्रव्यवहार केलेला आहे.

राष्ट्र स्तंभ लवकरात लवकर उभारणी व्हावी. यासाठी सदरील कामास मंजुरीसाठी तांत्रिकरीत्या आवश्यक असलेल्या कागदपत्रांची पूर्तता करण्याचे पत्र देवून मुक्ताईनगर नगरपंचायतीच्या मुख्याधिकारी अश्विनी गायकवाड यांचेकडे देखील त्यांनी पत्रव्यवहार केलेला आहे. त्यामुळे आमदार पाटील यांनी यासाठी युद्धपातळीवर पाठपुरावा सुरु केल्याचे दिसून येत आहे. येत्या १५ ऑगस्ट २०२२ रोजी मुक्ताईनगर शहरात सर्वांत उंच असा ७५ फुटी तिरंगा फडकण्यासाठीची तयारी सुरु आहे.

Protected Content