नवी दिल्ली-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रविवारी ७ बैठका बोलावल्या आहेत. या बैठकांदरम्यान देशातील अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा होणार आहे. लोकसभेच्या निवडणुकींसाठीचे मतदान संपल्यानंतर पंतप्रधानांकडून या बैठकांचे आयोजन करण्यात आले आहे. निवडणुकीचा निकाल ४ जूनला येणार आहे. मात्र त्याआधीच आलेल्या एक्झिट पोलमध्ये भाजपच्या नेतृत्वातील एनडीएला प्रचंड बहुमत मिळाल्याचे दिसत आहे. येथे निवडणुकीच्य निकालाआधीच पंतप्रधान मोदी कामाला लागले आहेत.
सूत्रांच्या माहितीनुसार मोदींच्या अध्यक्षतेखालील ज्या ७ बैठका होणार आहेत. त्यातील एका बैठकीत देशातील उष्णतेच्या लाटेवर चर्चा केली जाऊ शकते. केंद्र स्तरावर या उष्णतेच्या लाटेपासून बचावासाठी काय प्लान बनवण्यात आला आहे. याची माहिती घेतली जाईल. देशभरात उष्णतेचा कहर सुरू आहे. अनेक राज्यांमध्ये उष्णतेचे बळी गेले आहेत. लोकसभा निवडणुकीसाठीचे मतदान १ जूनला पार पडले. मतदानाचे सर्व टप्पे पार पडल्यानंतर अनेक वृत्तवाहिन्या तसेच संस्थांनी एक्झिट पोल दाखवले. या एक्झिट पोलमध्ये भाजपला बहुमत मिळणार असल्याचे दिसत आहे. त्यांना ४०० पार यावेळेस जागा मिळणार नसल्या तरीही तिसऱ्यांदा मोदी सरकार सत्ते येऊ शकते. एक्झिट पोलमध्ये महाराष्ट्रासाठी धक्कादायक अंदाज आहे. एनडीएला राज्यात मोठा धक्का बसू शकतो. राज्यात महायुतीला २२ जागा तसेच महाविकास आघाडीला २५ जागा मिळेल अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे.