आयोध्यानगरातील महावितरण क्वारंटाईन सेंटरमधून ६५ हजारांचे साहित्य गायब

जळगाव प्रतिनिधी । अयोध्येतील महावितरणच्या क्वारंटाईन सेंटरमधून चोरांनी ४ बेड, सहा गाद्या, पंखे यासह इतर साहित्य असा एकूण ६५ हजार १४५ किमतीच्या वस्तू चोरल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी महावितरणच्या अतिरिक्त कार्यकारी अभियंत्याच्या तक्रारीवरून एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अयोध्यानगरातील महावितरणच्या परिमंडळ कार्यालयात परिसरातील कार्यालये व कर्मचार्‍यांच्या निवासस्थानांच्या इमारत क्रमांक ७ येथील खोली क्रमांक ३ व ४ या दोन्ही खोल्यांमध्ये क्वारंटाईन सेंटर उभारण्यात आले होते. कोवीड सेंटर बंद झाल्यानंतर या खोल्यांमध्ये ४ प्रशिक्षणार्थी महिला राहत होत्या.  १७ जुलै २०२१ रोजी महिलांचे प्रशिक्षण संपल्याने या खोल्यांना कुलूप लावण्यात आले होते. ३ ऑगस्ट रोजी सायंकाळी सव्वा सात वाजेच्या सुमारास रेस्ट हॉऊसचे सुपरवायझर सुरेश भैरवनाथ जाधव यांनी अतिरिक्त कार्यकारी अभियंता नरेश मोरे यांना संबंधित क्वारंटाईन सेंटर असलेल्या खोल्याचे कुलूप तुटलेले तर त्यातील साहित्य दिसून येत नसल्याचे सांगितले. त्यानुसार मोरे यांनी त्यांचे सहकारी कनिष्ठ अभियंता यांच्यासह घटनास्थळ गाठले. 

खोल्यांमधील २३ हजार ६०० रुपयांचे ४ पलंग, २४ हजार ७८० रुपयांच ६ गाद्या, ११ हजार ८०२ रुपयांचे ६ पंखे, २ हजार ८९१ रुपयांच्या ७ उशा व २ हजार ७२ रुपयांचे २ ट्युबलाईट असा एकूण ६५ हजार १४५ रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी लांबविल्याचे समोर आले. २७ जुलै ३ ऑगस्ट दरम्यान घडलेल्या या प्रकाराबाबत कामाच्या व्यस्तता तसेच दौर्‍यांमुळे अभियंता नरेश मोरे यांनी शुक्रवार, १३ ऑग्स्ट रोजी एमआयडीसी पोलिसात तक्रार दिली. या तक्रारीवरुन एमआयडीसी पोलिसात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार आनंदसिंग पाटील हे करीत आहेत.

Protected Content