काशी विश्वनाथाला चक्क ६० किलोंचे सोने दान !

वाराणसी- वृत्तसंस्था | अनेक भाविक देवस्थानांना दान देत असतात. या अनुषंगाने एका भाविकाने काशी विश्‍वनाथ मंदिराला तब्बल ६० किलो सोने दान दिल्याचे जाहीर करण्यात आले आहे.

 

काशी विश्वनाथ मंदिराला एका भाविकाने ६० किलो सोने दिले आहे. यातील ३७ किलो सोन्याचा पत्रा मंदिराच्या गर्भगृहाच्या आतील भिंतीवर लावला जात आहे. या भाविकाची ओळख गुप्त ठेवण्यात आली आहे.

 

थेट मंदिरात न जाता मंदिराच्या दरवाजाबाहेरून दर्शन घेणे याला झरोखा दर्शन म्हटले जाते. या गर्भगृहाच्या भिंतीवर चांदीचा मुलामा काढून आता त्यावर सोन्याचा पत्रा लावण्यात येणार असल्याची माहिती मंदिर विश्वस्तांनी दिली. मंदिराला सोन्याचा मुलामा देण्याचा प्रकल्प तीन टप्प्यांत सुरू केला होता. भिंतींना प्रथम प्लॅस्टिकच्या थराने, नंतर तांब्याच्या पत्र्याने आणि शेवटी सोन्याच्या पत्र्याने झाकण्यात आले.

 

दहा कारागीरांच्या टीमने दिवसरात्र काम करून मंदिराच्या आतील भिंतीवर सोन्याच्या आतील भिंतीवर मुलामा चढवण्याचे काम तीस तासांत पूर्ण केले अशी माहिती विभागीय आयुक्त दीपक अग्रवाल यांनी दिली. अज्ञात भाविकाने दिलेल्या ६० किलो सोन्यापैकी उर्वरित २३ किलो सोने काशी विश्वनाथाच्या मुख्य मंदिराच्या सोनेरी घुमटाला आच्छादित करण्यासाठी वापरण्यात येणार आहे. दरम्यान, या अनोख्या दानाची मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू असल्याचे दिसून येत आहे.

Protected Content