ळगाव प्रतिनिधी । शहरातील समाज कल्याण विभागांतर्गत महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळात बोगस लाभार्थी दाखवून प्रति लाभार्थी १ लाख रूपये अशी ७०२ बोगस प्रकरणात सुमारे ६ कोटी ५० लाख रूपयांचा अपहार केल्याचे समोर आले आहे. याप्रकरणात सहा जणांना अटक करण्यात आली असून यात स्टेट व सेंट्रल बँकेच्या अधिकाऱ्यांचा समावेश आहे. अशी माहिती आर्थिक गुन्हे शाखे पोलीस निरीक्षक बळीराम हिरे यांनी सांगितले.
स्टेट बँकेचा सहायक जयेश रघुनाथ सोनार, सेट्रल बँकेच्या कर्मचारी सुनंदा बाबुराव तायडे (रा.वानखेडे हौसिंग सोसायटी), प्रकाश लक्ष्मीकांत कुळकर्णी (रा.राधाकृष्ण नगर), सागर विनायक पत्की (रा.भुसावळ) व अमरिश अनिल मोकाशी (रा. सदगुरु नगर) आणि बँकेचा क्लर्क सांगर वसंत अडकमोल (रा. महाबळ) या सहा जणांना अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी १ जुलै रोजी जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महात्मा फुले विकास महामंडळाकडून विशेष केंद्रीय अर्थ सहाय्य/ बिज भांडवल योजनेंतर्गत करण अरुण बागरे (रा.भुसावळ), समाधान एकनाथ तिलोरे (रा.तांबापुरा) व परमवीर सुनील आठवले (रा.तांबापुरा) या तिघांना बनावट लाभार्थी दाखवून २ लाख ४० हजार रुपयांचा धनादेश स्टेट बँकेच्या मुख्य शाखेत पाठविला होता. त्यात बँकेचा सहायक जयेश सोनार व इतर सहकाऱ्यांनी संगनमत करुन सेंट्रल बँकेच्या कर्मचारी सुनंदा तायडे यांना हाताशी धरुन २ लाख ४० ऐवजी सेंट्रल बँकेच्या खात्यातून ३ लाख रुपये अधिकचे काढून घेतले. या अधिकाऱ्यांनी धनादेश लाभार्थींच्या खात्यात न वटविता इतरांच्या खात्यात वर्ग केले. या लाभार्थ्यांच्या चार धनादेशाची २ लाख ४० हजाराची रक्कम महामंडळाच्या खात्यातून गेल्याने हा शासनाचा अपहार झाला तर तीन लाख रुपये बँकेच्या खात्यातून वर्ग झाले आहेत. त्यामुळे अपहाराचा आकडा हा ५ लाख ४० इतका झाला आहे. या गुन्ह्यात महात्मा फुले मासागवर्ग विकास महामंडळाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांचाही सहभाग असून आरोपींची संख्या अजून वाढणार असल्याची माहिती आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बळीराम हिरे यांनी दिली.
दरम्यान, बॅकेच्या लेखापरिक्षणात तीन लाख रुपयांचा तफावत आढळून आल्याने हा प्रकार उघड झाला. त्यानंतरही स्टेट बँकेच्या अधिकाऱ्यांनी अंतर्गत चौकशी केली व त्यात अपहार झाल्याचे उघड झाल्याने स्टेट बँकेचे महाप्रबंधक अशोक विनायकराव सोनुने (रा.जळगाव) यांनी १ जुलै २०१९ रोजी जिल्हा पेठ पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. २३ जानेवारी २०१८ रोजी हा प्रकार उघडकीस आला. दरम्यान, गुन्हा दाखल झाल्यानंतर हे प्रकरण आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आले. यात विभागाने अधिक चौकशी केली असता एका बोगस प्रकरणात १ लाख अशी ७०२ प्रकरणात सुमारे ६ कोटी ५० लाख रूपयांचा अपहार झाल्याचे समोर आले आहे. पोलीस निरीक्षक बळीराम हिरे, सहायक फौजदार रमेश सूर्यवंशी, चंद्रकांत शिंदे, राजेंद्र पाटील, अधिकार पाटील, नीलेश सूर्यवंशी व सुभाष सोनवणे यांनी या गुन्ह्याचा तपास करुन वरील सहा जणांना अटक केली.