नोकरी लाऊन देण्याच्या नावाखाली फसवणूक; तिघांविरूध्द गुन्हा

जळगाव प्रतिनिधी । लक्ष्मी फायनान्शियल सर्व्हीसेस या वित्तीय संस्थेत नोकरी देऊन त्याचे वेतन न देणे तसेच कर्ज मंजुरीकरीता ग्राहकांकडून प्रत्येकी दोन हजार रुपये वसूल करुन त्यांना कर्ज न देता त्यांची १६ लाख ६६ हजार ९९० रुपयात फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला असून याप्रकरणी संस्थेचे आशिष अशोकराव जामेकर (रा.वर्धा), व्यवस्थापक पंकज सर्जेराव पाटील (रा. वावडे, ता.अमळनेर) व प्रशासन विभागाच्या अश्विनी दांडी (रा.वर्धा) यांच्याविरुध्द रामानंद नगर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. यात सात कर्मचारी व ३१२ कर्जदार सभासदांची फसवणूक झाली आहे.

याबाबत खंडेराव बापू महाले (वय २८,रा.हरिविठ्ठल नगर) या तरुणाने दिलेल्या फिर्यादीनुसार, खंडेराव महालेसह जितेंद्र रमेश काळे (रा.शिवाजी नगर), संतोष अशोक पजई (रा.जुना खेडी रोड), दीपक अरुण महाजन (रा.भुसावळ), गजानन शालिग्राम शिसोदे (रा.पारोळा), नीता भीमराव पाटील (रा.पारोळा) व धनश्री विकास बडगुजर (रा.अमळनेर) आदी जणांना संशयित आरोपींनी लक्ष्मी फायनान्शीयल सर्व्हीसेस नागपूर या संस्थेच्या नावाने जळगावातील नियुक्ती पत्रे देऊन दरमहा १५ हजार रुपये वेतन देण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार सर्व जण नोकरी करीत असताना कर्ज प्रकरण मंजुर करुन घेण्यासाठीच्या सेवा व मार्गदर्शन आवश्यक असणाऱ्या गरजू लोकांकडून प्रत्येकी दोन हजार रुपये वसुल करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार सर्वांनी आपआपल्या ग्राहकांकडून कर्ज मंजूर करण्यासाठी एकूण ३१२ जणांकडून दरमहा दोन हजार रुपये घेऊन ते पंकज पाटील याच्याकडे जमा केले. त्यावर आशिष जामेकर याने कर्ज प्रकरणाची फाईल तयार करुन रक्कम मिळाल्याचे नमून करुन त्यावर शिक्का व सह्या केलेल्या पावत्या तयार केलेल्या आहेत. जळगावच्या कार्यालयाचा पत्ता रामानंद नगर बस थांब्याच्या मागे, हनुमान मंदीर रोड असा दिला आहे.

दरम्यान, नोकरीवर ठेवलेल्या सर्व सात जणांकडून तिघांनी रकमा वसूल करुन घेतल्या तसेच कोणाचा ११ ते कोणाचा सहा महिन्याचा पगार देखील दिलेला नाही. तगादा लावला असता ४५ दिवसाच्या आत पगार देण्याबाबत नोटरी करुन दिली, प्रत्यक्षात त्यानंतरही कोणालाच पगार दिलेला नाही. खंडेराव महाले या तरुणाने ६९ सभासदाकडून प्रत्येकी दोन हजार रुपये घेवून ते कार्यालयात जमा केले आहेत तर जितेंद्र काळे यांनी ३८ सभासदांची रक्कम तसेच ११ महिन्याचा पगार, संतोष पजई यांचे ६६ सभासद तसेच ११ महिन्याचा पगार, दीपक महाजन यांचे १९ सभासद व पाच महिन्याचा पगार, गजानन शिसोदे यांचे ३० सभासद व चार महिन्याचा पगार नीता पाटील यांचे ९० सभासद व तीन महिन्याचा पगार व धनश्री पाटील यांचे ३० सभासद व ४ महिन्याचा पगार अशी एकूण सर्व १६ लाख ६६ हजार ९९० रुपयांची फसवणूक झाली आहे.

 

 

Protected Content