छत्रपती संभाजीनगर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज वृत्तसेवा | छत्रपती संभाजीनगरच्या वाळूज औद्योगिक वसाहतीत एका हँडग्लोज बनवणाऱ्या कंपनीस लागलेल्या भीषण आगीच्या दुर्घटनेत एकूण 6 कामगारांचा आगीत होरपळून मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. दरम्यान या दुर्घटनेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तीव्र शोक व्यक्त केला आहे. तर, मयत कामगारांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्री सहायता निधीतून प्रत्येकी 5 लाख रुपये देण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. याशिवाय जखमी कामगारांना तातडीने शासकीय खर्चाने सर्व वैद्यकीय उपचार द्यावेत अशाही सूचना त्यांनी प्रशासनाला दिल्या आहेत. आग शमविण्यासाठी तसेच अडकलेल्यांना सुखरूप काढण्यासाठी करण्यात आलेल्या बचाव कार्याची माहितीही त्यांनी घेतली व हे मदत कार्य व्यवस्थित पार पडण्यास सांगितले, असल्याची माहिती मुख्यमंत्री कार्यालयाकडून देण्यात आली आहे.
याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ट्वीट करत म्हटले आहे की, “छत्रपती संभाजीनगरच्या वाळूज औद्योगिक वसाहतीत एका हँडग्लोज बनवणाऱ्या कंपनीस लागलेल्या भीषण आगीच्या दुर्घटना दुर्दैवी आणि दुःखदायक आहे. मध्यरात्री लागलेल्या या आगीत सहा कामगारांचा जळून मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती असून या मृत कामगारांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून प्रत्येकी 5 लाख रुपये देण्याचे निर्देश दिले आहेत. याशिवाय जखमी कामगारांना तातडीने शासकीय खर्चाने सर्व वैद्यकीय उपचार द्यावेत अशाही सूचना प्रशासनाला दिल्या आहेत.”
वाळूज भागातील कंपनीत लागलेल्या आगीच्या घटनेनंतर विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली आहे. तसेच, याबाबत ट्वीट करत दानवे म्हणाले की, “राज्यातील औद्योगिक परिसरात सातत्याने मनुष्य हानीचे अपघात घडत आहे. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ व कामगार विभाग अशा दुर्दैवी घटना घडत असताना कोणतेही सुरक्षेची काळजी घेत असल्याचे दिसत नाही. अशीच घटना आज रात्री संभाजीनगर येथील वाळुज एमआयडीसीतील सनराईस एटरप्राईज या कंपनीत घडली. या दुःखद घटनेत 6 कामगारांचा दुर्दैवी मृत्यू झाला. यामध्ये दोषी असणाऱ्या संबंधितावर कारवाई करावी व कंपनी मालकासह ठेकेदारांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी सदरील ठिकाणी पाहणी करून केली,” असल्याचे दानवे म्हणाले.