यावल वनविभागात बुद्ध पौर्णिमेला ४९२ वन्यजीव आणि पक्ष्यांची नोंद


यावल लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । बुद्ध पौर्णिमेच्या शुभ पर्वावर यावल प्रादेशिक वनविभागात ‘निसर्ग अनुभव’ या विशेष उपक्रमांतर्गत वन्यप्राणी प्रगणना कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. या वन्यजीव गणनेसाठी वनविभागाने तब्बल ३९ मचाणांची व्यवस्था केली होती, ज्यात निसर्गावर प्रेम करणारे १५० हून अधिक नागरिक, पर्यावरणप्रेमी आणि वन विभागासह इतर शासकीय विभागातील अधिकारी-कर्मचाऱ्यांनी सक्रिय सहभाग घेतला. प्रज्वलित पौर्णिमेच्या शीतल प्रकाशात सहभागी सदस्यांनी संपूर्ण रात्रभर जंगलात थांबून विविध वन्यजीव प्रजातींचे बारकाईने निरीक्षण केले.

या प्राणी प्रगणनेदरम्यान बिबट्या, अस्वल, कोल्हा, लांडगा, ससा, भेकर, निलगाय, रानडुक्कर, चिंकारा, चौशिंगा, काळवीट, साळिंदर यांसारख्या अनेक वन्यप्राण्यांच्या तसेच विविध आकर्षक पक्ष्यांच्या प्रजातींची नोंद करण्यात आली. यावर्षीच्या गणनेत एकूण ४९२ वन्यजीव आणि पक्षी आढळून आले असून, यात २७ पेक्षा अधिक वेगवेगळ्या प्रजातींचे दर्शन झाले. सहभागी निसर्गप्रेमी आणि वन्यजीव अभ्यासकांनी आपल्या निरीक्षणांचे महत्त्वपूर्ण अभिप्राय नोंदवले आहेत.

या कार्यक्रमासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत ऑनलाइन नोंदणी प्रणाली (QR Code) कार्यान्वित करण्यात आली होती, ज्याला चांगला प्रतिसाद मिळाला. रात्रीच्या शांत वातावरणात उंच मचाणांवरून वन्यजीवांचे निरीक्षण करणे हा अनुभव निसर्गप्रेमींसाठी अत्यंत रोमांचक आणि अविस्मरणीय ठरला. विशेष म्हणजे, रावेर वनक्षेत्रात प्रत्यक्ष बिबट्याचे दर्शन झाले, तर वैजापूर वनक्षेत्रात बिबट्याच्या पाऊलखुणा आढळल्याने वन्यजीव विभागात उत्सुकता निर्माण झाली आहे.

या महत्त्वपूर्ण उपक्रमासाठी अतिरिक्त पोलीस अधीक्षक अशोक नखाते, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कुर्बान तडवी, सहाय्यक वनसंरक्षक समाधान पाटील, तहसीलदार रावेर बंडू कापसे, मानद वन्यजीव रक्षक रविंद्र फालक, वन्यजीव अभ्यासक अमन गुजर यांच्यासह विविध संस्थांचे प्रतिनिधी, महाविद्यालयीन प्राध्यापक आणि शासकीय अधिकारी उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन वनसंरक्षक (प्रादेशिक) धुळे वनवृत्त श्रीमती निनू सोमराज, उप वनसंरक्षक जमीर शेख आणि सहाय्यक वनसंरक्षक प्रथमेश हाडपे व समाधान पाटील यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली यावल वनविभागातील सर्व वनपरिक्षेत्र अधिकारी, वनपाल, वनरक्षक आणि वनमजूर यांनी अथक परिश्रम घेऊन केले.

या उपक्रमाबद्दल बोलताना सहाय्यक वनसंरक्षक समाधान पाटील म्हणाले, “ढगाळ हवामान आणि पावसाच्या शक्यतेमुळे काही प्रमाणात अडचणी येतील असे वाटत होते, परंतु निसर्गप्रेमींच्या उत्साहामुळे आणि अनुकूल हवामानामुळे विविध वन्यजीवांचे दर्शन घेणे शक्य झाले. अचानक बदललेल्या हवामानामुळे प्राण्यांच्या हालचाली आणि वर्तनाचे निरीक्षणही वेगळ्या पद्धतीने अनुभवता आले.”