दहिगावात ४८ तासांची संचारबंदी ! : कडेकोट पोलीस बंदोबस्त

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील दहिगाव येथे दोन गटांमध्ये निर्माण झालेल्या वादाच्या पार्श्‍वभूमिवर, काल सायंकाळ पासून ४८ तासांची संचारबंदी लागू करण्यात आली आहे.

या संदर्भातील माहिती अशी की, यावल तालुक्यातील दहिगाव येथे परवा रात्री दोन समुदायांमध्ये तणाव निर्माण झाला. पोलीस प्रशासनाने तात्काळ धाव घेत वातावरण नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र काल दिवसभर गावात मोठ्या प्रमाणातमध्ये तणावाचे वातावरण दिसून आले.

या अनुषंगाने कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी म्हणून सहायक जिल्हाधिकारी तथा फैजपुरचे प्रभारी उपविभागीय अधिकारी अर्पित चौहान यांनी दहिगावात दिनांक ८ फेब्रुवारी रोजी सायंकाळी साडे सात वाजेपासून ४८ तासांसाठी संचारबंदी लागू केली आहे. या संदर्भातील निर्देश जारी करण्यात आले आहेत. संचारबंदीच्या कालावधीत कुणालाही घराबाहेर पडता येणार नसून अत्यावश्यक सेवांचा अपवाद वगळता सर्व दुकाने व व्यावसायिक प्रतिष्ठाने देखील बंद राहणार आहेत. फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ च्या कलम १४४ (१) अन्वये संचारबंदी लागू करण्यात आली आहे.

दरम्यान, दहिगावात कोणताही अनुचीत प्रकार घडू नये म्हणून पोलीस प्रशासनाने कडेकोट बंदोबस्त लावला असून गावातील वातावरण आता नियंत्रणात असल्याचे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.

Protected Content