जळगाव प्रतिनिधी । जळगाव जिल्ह्यात परदेशातून प्रवास करून आलेल्या नागरिकांना ओमिक्रॉन संसर्गाचा प्रादूर्भावाची शक्यता नाकारता येत नाही. शहरात गेल्या ८ दिवसात ४८ नागरिक परदेशवारी करून आले असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली. त्यांना नियमानुसार ७ दिवस होम क्वारंटाईन करण्यात आले असून पुन्हा ७ दिवसांनंतर आरटीपीसीआर तपासणी केली जाणार आहे. अहवाल आल्यानंतरच होम क्वारंटाईन कालावधी वाढविण्याचा वा कमी करण्याचा निर्णय घेण्यात येईल.
जिल्हयात ऑगस्टनंतर संसर्ग साखळी खडीत होत असल्याने संसर्ग प्रतिबंधात्मक नियमांत शिथीलता देण्यात आली आहे. त्यामुळे शहरासह जिल्ह्यात स्थानिक स्तरावर मार्केट परिसर, व्यापारी संकुलांमध्ये लग्नसराईमुळे दैनंदिन गर्दी दिसून येत आहे. त्यातच परदेशात नोव्हेंबरच्या शेवटच्या सप्ताहात ओमीक्रॉन चे संक्रमण होत असल्याने देशपातळीवर कडक सूचनांचे निर्देश देण्यात आले आहे. राज्य शासनाकडून आलेल्या निर्देशानुसार जिल्ह्यात मास्क तसेच लसीकरणाच्या सक्तीसह लसीकरणाला वेग देण्यात आला आहे. डिसेंबरच्या सुरूवातीलाच राज्यात ओमिक्रॉन संसर्गाचा शिरकाव झाल्याने परदेशातून येणार्या नागरिकांची तपासणी करून त्यांना विलगीकरण कक्षात ठेवण्याचे निर्देश आहेत.
परदेशवारीतील २७ जणांची झाली तपासणी
जिल्हयात तसेच शहरात विमान प्रवासाव्दारे परदेशवारी करून आलेले ४८ नागरिक शहरात दाखल झाले आहेत. यात १ डिसेंबर रोजी २, २ डिसेंबर रोजी ६ तर ७ डिसेंबर रोजी तब्बल २१ नागरिक परदेशगमन करून आलेले आहेत. या सर्व नागरिकांची आरटीपीसीआर चाचणी अहवाल निगेटिव्ह असून विमानतळावरच तपासणी झालेली आहे. परदेशवारी करून आलेल्या नागरिकांची माहिती मिळाल्यानुसार या ४८ नागरिकांपैकी २७ नागरिकांची तरी आरटीपीसीआर तपासणी करण्यात आली आहे. त्यांना नियमानुसार ७ दिवस होम क्वारंटाईन करण्यात आले असून पुन्हा ७ दिवसांनंतर आरटीपीसीआर तपासणी केली जाणार आहे. अहवाल आल्यानंतरच होम क्वारंटाईन कालावधी वाढविण्याचा वा कमी करण्याचा निर्णय घेण्यात येईल अशी माहिती पालिका उपायुक्त श्याम गोसावी यांनी दिली आहे.
जिल्हा प्रशासन सतर्क
डिसेंबरच्या सुरूवातीलाच राज्यात ओमीक्रॉन संसर्ग प्रादूर्भावाचे रूग्ण आढळून आले आहेत. या पाश्वर्र्भूमीवर तसेच संसर्गाच्या तिसर्या लाटेचा धोका निर्माण होउ नये यासाठी जिल्हा प्रशासन सतर्क झाले आहे. प्रशासकिय कार्यालयात कामानिमित्त येणार्या कर्मचारी, सर्वसामान्य नागरिकांना मास्क आणि लसीकरणाचे डोस पूर्ण असतील तरच प्रशासकिय कार्यालयात प्रवेश देण्यात येत आहेत. असे असलेतरी स्थानिक पातळीवर मात्र परदेशातून आलेल्या नागरिकांच्या नोंदीविषयी माहिती घेतली असता प्रथमतः टाळाटाळच करण्यात आली. यावरून स्थानिक प्रशासनाची संसर्गाच्या तिसर्या लाटेबाबत जागृतता दिसून आली.
शासकीय कार्यालय प्रवेशव्दारावरच तपासणी
जिल्ह्यात या नव्या व्हेरियंटचा संसर्ग प्रादूर्भाव व तिसर्या लाटेचा धोका निर्माण होउ नये, यासाठी मास्कच्या वापरासह लसीकरण करणे बंधनकारक करण्यात आले आहे. या पार्श्वभूमिवर जिल्हाधिकारी कार्यालयात प्रशासकिय कामानिमित्त येणार्या सर्वसामान्य नागरिकांना, अधिकारी कर्मचार्यांना मास्क, लसीकरणाचे प्रमाणपत्र, अथवा लसीकरण नसेल तर किमान ७२ तासांसाठी वैध असलेेले आरटीपीसीआर निगेटिव्ह चाचणीचे प्रमाणपत्र चौकशी व पडताळणी करूनच प्रवेश दिला जात आहे. या तपासणीसाठी पोलीस प्रशासनाकडून नियमितरित्या तीन पोलीस कर्मचारी मुख्य प्रवेशव्दारावरच तैनात करण्यात आले आहेत.
जिल्हा पोलीस मुख्यालय
जिल्हा पोलीस मुख्यालयात सुरूवातीपासूनच नो मास्क नो एन्ट्रीचे कडक निबंर्ध अंमलबजावणी केली जात आहे.