मुंबई-लाईव्ह ट्रेंड्स न्युज वृत्तसेवा | महावितरण, महापारेषण आणि महानिर्मिती या वीज कंपन्यांत कार्यरत असलेले ४२ हजार कंत्राटी वीज कामगारांनी आपल्या विविध मागण्यांसाठी ५ मार्च पासून बेमुदत संपावर जाण्याचा इशारा दिला आहे.
त्यामुळे संबंधित कंपन्यांच्या कामकाजावर परिणाम होण्याची शक्यता आहे. वीज कंपन्यांत रिक्त असलेल्या पदांवर कंत्राटी कर्मचाऱ्यांना सामावून घ्या, कंत्राटी कर्मचारी स्थायी होईपर्यंत पद भरती करू नका, १ एप्रिलपासून ३० टक्के वेतनवाढ करा, अशा विविध मागण्यांसाठी कंत्राटी वीज कामगारांनी महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ कंत्राटी कामगार संघटनांच्या संयुक्त कृती समितीच्या माध्यमातून नुकताच दोन दिवसांचा लाक्षणिक संप केला होता. मात्र, ऊर्जा विभागासह वीज कंपन्यांनी त्याची फारशी दखल घेतली नाही. त्यामुळे संयुक्त कृती समितीने संपाची हाक दिली आहे.