राज्यात 352 ‘सखी मतदार केंद्र’

sakhi matadan kendra

मुंबई प्रतिनिधी । विशेष महिलांसाठी महिला नियंत्रण आणि व्यवस्थापनावर लक्ष केंद्रित करणारी राज्यात 352 ‘सखी मतदार केंद्र’ स्थापन करण्यात येत आहेत.

प्रत्येक विधानसभा मतदारसंघात किमान एक ते कमाल तीन अशी ही मतदान केंद्रे असतील. या मतदान केंद्रांमध्ये पोलिसांपासून ते निवडणूक कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचारी या सर्व महिला असतील. लैंगिक समानता आणि मतदार प्रक्रियेत महिलांचा अधिकाधिक सकारात्मक सहभाग वाढावा या अनुषंगाने सखी मतदान केंद्रे उभारली जाणार आहेत. महिलांकडून नियंत्रित करण्यात येणार या मतदान केंद्रांमध्ये कोणताही विशिष्ट रंग वापरला जाणार नाही. या केंद्रांमध्ये कोणत्याही विशिष्ट राजकीय पक्षाच्या रंगाचा अनावश्यक वापर करु नये, असे स्पष्ट निर्देश भारत निवडणूक आयोगाने दिले आहेत. तसेच या केंद्रात तैनात असलेल्या महिला त्यांच्या आवडीचा कोणत्याही रंगाचा पोशाख परिधान करू शकतात. विशेष म्हणजे हे केंद्र अधिकाधिक आकर्षक आणि सुंदर बनवण्यासाठी रांगोळी, रंगरंगोटीसह स्वच्छतेवरही भर देण्यात येईल. अशी केंद्रे निवडताना सुरक्षिततेवर विशेष लक्ष पुरवण्यात येईल. संवेदनशील ठिकाणे टाळून तहसील कार्यालय, पोलीस ठाण्याजवळ ही केंद्र उभारण्यात येतील. ज्या मतदान केंद्रांवर निवडणूक प्रक्रियेतील अधिकाऱ्यांचा कायम संपर्क राहील अशा केंद्रांची, सखी मतदान केंद्रांकरिता विशेष निवड करण्यात आली आहे.

Protected Content