बुलढाण्यातील खडकाळ जमिनीवर फुलविले कमळ

बुलढाणा – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | कमळ चिखलातच नव्हे तर खडकाळ जमिनीवर देखील फुलवले जाऊ शकते, असा चमत्कार बुलडाणा येथील घडला आहे. पहा लाईव्ह ट्रेंड्स न्यूज विशेष रिपोर्ट…

बुलडाणा येथील कमलेश देशमुख आणि शेलगाव जहागीर येथील भागवत ठेंग हे नात्याने जावई – मेव्हणे असलेल्या जोडीने कमळाची बाग फुलवून दिलाय. लॉकडाऊन मध्ये नोकरी गेलेल्या कमलेश ने आपल्याकडे शेती नसतांनाही मेव्हण्याला सोबत घेऊन केवळ १० गुंठे खडकाळ जमिनीवर कमळ शेती करायला सुरुवात केलीय, आणि आज ते लाखो रुपयांचे उत्पन्न घेत आहेत.

कमलेश देशमुख हे दुबईला नोकरीला होते, लॉकडाऊन पूर्वी गावाकडे आले आणि नंतर परत जाताच आलं नाही. इकडे नोकरीही मिळाली नाही. परंतु कमलेशला झाडांची, फुलांची खूप आवड आणि त्याच आवडीला त्याने आपल्या उत्पन्नाचा स्त्रोत करायचं ठरवलं. सुरुवातीला त्याने आपल्या घराच्या छतावर परसबाग तयार करून कमळ शेतीला सुरुवात केली. त्याला प्रतिसादही उत्तम मिळायला लागला. त्यामुळे आता कमळाची शेती करण्याचा विचार त्याच्या मनात आला. मात्र कमलेशकडे शेती नसल्याने कमलेशने आपल्या मेव्हण्याला विनंती केली आणि त्याला सोबत घेऊन खडकाळ जमिनीमधील १० गुंठे शेत सपाटीकरण करून त्यात कमळ शेती करायला सुरुवात केली. कमळ शेतीचा कमलेशला थोडेफार अनुभव होताच, त्यात सोशल मीडियाचा आधार घेत त्याने आपल्या ज्ञानात भर घातली. आज त्यांच्याकडे कमळाच्या शेकडो जाती आहेत. ज्या खडकाळ जमिनीत काहीच उत्पन्न होत नव्हते, त्यात आज कमळ फुलले आहेत. ज्या सोशल मीडियाचा वापर बहुतेक जन मनोरंजन म्हणून करतात, त्याच सोशल मीडियाच्या माध्यमातून हे जावाई – मेव्हणे आपल्या व्यवसायाला वाढवत आहेत. फुलांची विक्री करत आहेत आणि त्याच्यातून लाखो रुपये उत्पन्न घेत आहेत.

सोबत म्हणून असलेला कमलेश यांचा मेव्हणा भागवत ठेंग हे सुद्धा रोपांना पाणी देणे, त्यांची काळजी घेणे सोबत इतरही कामात कमलेशची मदत करतात. आज रोजी कमलेश आणि भागवत या साल्या मेव्हण्याची जोडी, कमळ, वॉटर लिली याची शेकडो प्रकारच्या जातीची रोपे तयार करून राज्यासह परराज्यात विक्री करून लाखोंचे उत्पन्न मिळवत आहेत. खडकाळ जमिनीत काहीच येत नाही, असं म्हणणाऱ्यांनी या जोडीचा आदर्श घ्यावा, एव्हढे मात्र नक्की.

 

 

 

Protected Content