जळगाव शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या जुन्या आणि नव्या बी.जे. मार्केटमधील गेल्या १५ वर्षांपासून प्रलंबित असलेल्या समस्या निकाली काढण्यासाठी महापौर दीपमाला काळे यांनी आक्रमक पाऊल उचलले आहे. ‘माझं जळगाव, स्वच्छ जळगाव’ या संकल्पनेतून गुरुवारी आणि शुक्रवारी या दोन्ही मार्केटमध्ये विशेष स्वच्छता अभियान राबवण्यात आले असून, यामुळे मार्केट परिसराने दीर्घकाळानंतर मोकळा श्वास घेतला आहे. केवळ स्वच्छताच नव्हे, तर अतिक्रमण निर्मूलन, विद्युत व्यवस्था आणि बांधकाम दुरुस्ती या विषयांवरही महापौरांच्या आदेशानंतर प्रशासनाने युद्धपातळीवर काम सुरू केले आहे.
नुकत्याच झालेल्या महासभेत शिवसेनेचे गटनेते विष्णू भंगाळे आणि नगरसेविका अर्चना पाटील यांनी मार्केटमधील अस्वच्छतेचा प्रश्न अत्यंत गांभीर्याने उपस्थित केला होता. या प्रश्नाची तातडीने दखल घेत महापौर दीपमाला काळे यांनी आरोग्य विभागाला २ आणि ३ एप्रिल रोजी विशेष मोहीम राबवण्याचे निर्देश दिले. या दोन दिवसांत मार्केटमधील प्रसाधनगृहांची संपूर्ण स्वच्छता करण्यात आली असून, कर्तव्यात कसूर करणाऱ्या संबंधित ठेकेदाराला ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावण्याची कार्यवाहीदेखील प्रशासनाकडून सुरू करण्यात आली आहे.

स्वच्छतेसोबतच मार्केटमधील इतर पायाभूत सुविधांकडेही लक्ष देण्यात आले आहे. अतिक्रमण विभागाने आजूबाजूचे अनधिकृत अडथळे हटवून परिसर मोकळा केला आहे, तर विद्युत विभागातर्फे ज्या ठिकाणी पथदिवे नाहीत, तिथे सर्वेक्षण पूर्ण करून नवे दिवे लावण्याचे काम सुरू झाले आहे. तुटलेले रेलिंग आणि किरकोळ बांधकामांची पाहणी बांधकाम विभागाने केली असून, पुढील १५ दिवसांत हे काम पूर्ण करण्याचे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिले आहे. शुक्रवारी सकाळी महापौर दीपमाला काळे यांनी स्वतः मार्केटमध्ये जाऊन सुरू असलेल्या कामांची पाहणी केली. यावेळी मार्केटमध्ये साचणारे पाणी आणि प्रसाधनगृहांच्या गळतीबाबत त्यांनी तीव्र संताप व्यक्त करत, या त्रुटी तात्काळ दूर करण्याचे कडक आदेश संबंधित विभागाला दिले.
अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या समस्या मार्गी लागत असल्याचे पाहून मार्केट असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी महापौरांची भेट घेऊन त्यांचे आभार मानले. हे अभियान आरोग्य विभागाचे सहाय्यक आयुक्त उदय पाटील यांच्या नेतृत्वाखाली अधिकारी रमेश कांबळे, स्वच्छता निरीक्षक रुपेश भालेराव, मुकेश पाटील, मयूर सपकाळे, मुकादम विशाल चांगरे, बीव्हीजी सुपरवायझर संदीप शर्मा आणि गणेश कोळी यांच्या टीमने यशस्वीपणे राबवले. महापौरांच्या या पुढाकारामुळे मार्केटचा चेहरामोहरा बदलत असून, व्यापाऱ्यांनीही यापुढे महापालिकेला पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आहे.



