जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । स्पर्धा परीक्षांच्या युगात विद्यार्थ्यांना सक्षम बनवण्यासाठी युवासेना-शिवसेनेतर्फे सलग सातव्या वर्षी मोफत सीईटी (CET) सराव परीक्षेचे आयोजन करण्यात आले असून, जळगाव शहर व जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी ही एक मोठी संधी ठरणार आहे. अकरावी, बारावी तसेच पदवी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष परीक्षेचा अनुभव देण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
राज्यात युवासेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वात आणि युवासेना सचिव आमदार वरूण सरदेसाई यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम सातत्याने राबवला जात आहे. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी आणि स्पर्धात्मक तयारीसाठी उपयुक्त ठरणाऱ्या या सराव परीक्षेला दरवर्षी मोठा प्रतिसाद मिळत आहे.

यंदा 5 एप्रिल 2026 रोजी सकाळी 10 ते दुपारी 1 या वेळेत जळगावातील गणेश कॉलनी येथील महावीर क्लासेस येथे ही परीक्षा ऑफलाईन पद्धतीने घेतली जाणार आहे. अभियांत्रिकी, वैद्यकीय आणि फार्मसी या क्षेत्रांसाठीच्या कॉमन एन्ट्रन्स टेस्टचा सराव या परीक्षेद्वारे विद्यार्थ्यांना करता येणार आहे. त्यामुळे प्रत्यक्ष सीईटी परीक्षेपूर्वी विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिकेचा स्वरूप, वेळेचे नियोजन आणि आत्मविश्वास वाढविण्याची संधी मिळणार आहे.
या सराव परीक्षेत सहभागी होण्यासाठी विद्यार्थ्यांनी ऑनलाईन नोंदणी करणे अनिवार्य आहे. 3 एप्रिल 2026 ही नोंदणीची अंतिम मुदत निश्चित करण्यात आली आहे. त्यामुळे इच्छुक विद्यार्थ्यांनी वेळेत नोंदणी करून या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.
अधिक माहितीसाठी युवासेना विभागीय सचिव विराज कावडीया (मो. 9422222699) आणि युवाधिकारी प्रितम शिंदे (मो. 9405446632) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. जास्तीतजास्त विद्यार्थ्यांनी या मोफत सराव परीक्षेचा लाभ घेऊन आपल्या करिअरच्या दिशेने भक्कम पाऊल टाकावे, असेही युवासेनेतर्फे सांगण्यात आले आहे.



