जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । कंजरभाट समाज युवा फाउंडेशनची वार्षिक सर्वसाधारण सभा रविवारी (दि. २२ मार्च २०२६) के.बी.एस. समाजमंदिर येथे उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. या सभेत सर्वानुमते योगेश अनिल बागडे यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली असून, त्यांच्या नेतृत्वात समाजकार्याला नवी गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
सभेची सुरुवात संस्थेचे सचिव राहुल नेतलेकर यांनी प्रास्ताविकाने केली. त्यांनी मागील बैठकीच्या कार्यवाहीचे वाचन करून उपस्थितांना माहिती दिली तसेच संस्थेचा वार्षिक अहवाल सादर केला. अहवालामध्ये वर्षभरात राबविण्यात आलेल्या विविध सामाजिक, शैक्षणिक आणि युवकाभिमुख उपक्रमांचा आढावा घेण्यात आला, ज्याचे उपस्थितांनी कौतुक केले.

या सभेला मुख्य सल्लागार मोहन गारुंगे, उपाध्यक्ष प्रदीप नेतलेकर, कार्याध्यक्ष शशिकांत बागडे यांच्यासह विजय अभंगे, नरेश बागडे, उमेश माछरेकर, संदीप गारुंगे, गणेश बागडे, वीर दहियेकर, गौतम बागडे, क्रांती बाटूंगे, संदीप बागडे, पंकज गागडे, राहुल दहियेकर, कार्तिक बाटूंगे, जयेश माछरे आदी समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित सदस्यांनी नव्या नेतृत्वाबद्दल विश्वास व्यक्त करत संस्थेच्या कार्यात सक्रिय सहभाग नोंदविण्याची तयारी दर्शवली.
नवनिर्वाचित अध्यक्ष योगेश अनिल बागडे यांचे अभिनंदन करताना उपस्थितांनी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी एकत्रितपणे काम करण्याचा संकल्प केला. युवकांच्या सहभागातून समाजातील विविध प्रश्नांवर सकारात्मक बदल घडवून आणण्याचा निर्धारही यावेळी व्यक्त करण्यात आला.
कार्यक्रमाच्या शेवटी विजय अभंगे यांनी आभार प्रदर्शन केले. संपूर्ण सभा उत्साहात पार पडली असून, नव्या कार्यकारिणीच्या माध्यमातून समाजहिताच्या विविध उपक्रमांना अधिक बळ मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.



