Home Cities जळगाव भटक्या कुत्र्यांविरोधात मोहीम राबवा; नगरसेविका अंकिता पाटील यांची महापौरांकडे मागणी

भटक्या कुत्र्यांविरोधात मोहीम राबवा; नगरसेविका अंकिता पाटील यांची महापौरांकडे मागणी

0
135

जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी ।  प्रभाग क्रमांक ७ मधील विविध वसाहतींमध्ये भटक्या कुत्र्यांची वाढती संख्या नागरिकांसाठी डोकेदुखी ठरत असून या पार्श्वभूमीवर नगरसेविका अंकिता यांनी महापौर दीपमाला काळे यांना तातडीने कारवाई करण्याबाबत निवेदन सादर केले आहे. लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला असून प्रशासनाने त्वरित उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नगरसेविका अंकिता पंकज पाटील यांनी महापौर दीपमाला काळे यांच्याकडे सोमवार, २ मार्च रोजी निवेदनाद्वारे केली आहे.

नगरसेविका अंकिता पाटील यांनी दिलेल्या निवेदनात प्रभाग क्रमांक ७ मधील शिवकॉलनी परिसरातील गट क्रमांक ६० व १४, तसेच वर्धमान हावट्स परिसर, आशाबाबा नगर आणि आर.एम.एस. कॉलनी येथे भटक्या कुत्र्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्याचे नमूद केले आहे. या कुत्र्यांमुळे नागरिकांना दररोज भीतीचे वातावरण सहन करावे लागत असून रस्त्यावरून ये-जा करताना असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे.

विशेषतः शाळेत जाणारी लहान मुले, सकाळ-संध्याकाळ फिरायला जाणारे ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना कुत्र्यांच्या समूहामुळे अडचणींचा सामना करावा लागत आहे. रात्रीच्या वेळी कुत्र्यांचा टोळक्याने वावर असल्याने झोपेमध्ये व्यत्यय येत असून भुंकण्याच्या आवाजामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. वाहनचालकांनाही अचानक रस्त्यावर येणाऱ्या कुत्र्यांमुळे अपघाताचा धोका निर्माण झाला आहे.

काही ठिकाणी कुत्र्यांनी नागरिकांच्या मागे धाव घेणे तसेच चावा घेण्याच्या घटना घडल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. त्यामुळे महानगरपालिकेने तातडीने निर्बंधात्मक उपाययोजना करून भटक्या कुत्र्यांचे लसीकरण, निर्बिजीकरण आणि सुरक्षित पुनर्वसन करावे, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.

 


Protected Content

Play sound