विद्यापीठात ३०६ कोटींच्या अर्थसंकल्पाला मान्यता

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या सन २०२२-२३ या आर्थिक वर्षासाठी ३०६.७७ कोटी रूपयांच्या अर्थसंकल्पाला अधिसभेच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.  कुलगुरू प्रा.व्ही.एल. माहेश्वरी यांच्या अध्यक्षतेखाली अधिसभेची बैठक झाली.

 

या अर्थसंकल्पात ३३.९१ कोटी रुपयांची तुट दर्शविण्यात आली आहे.  मंगळवार २९ मार्च रोजी झालेल्या अधिसभेच्या बैठकीत व्यवस्थापन परिषद सदस्य दीपक बंडू पाटील यांनी हा अर्थसंकल्प सादर केला. विकासाला चालना देणाऱ्या या अर्थसंकल्पात खान्देशातील लोककलांना प्रोत्साहन देण्यासाठी व लोककलाकरांना मदतीचा हात देण्यासाठी अण्णाभाऊ साठे लोककला महोत्सवाचे आयोजनाकरीता ५ लाखांची तरतूद करण्यात आली आहे.

 

नव्याने सुरु करीत असलेल्या सावित्रीबाई फुले प्रथम शिक्षित महिला पुरस्कारासाठी ५ लाख, स्वातंत्र्य  दिन अमृत महोत्सवी वर्षासाठी ७५ लाख तसेच नंदूरबार जिल्ह्यातील आदिवासी बहूल मोलगी येथे विद्यापीठ संचलित विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयासाठी ५० लाख, ज्ञानस्त्रोत केंद्राद्वारा ग्रंथालयशास्त्रातील पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरु करणेसाठी १५ लाख व  पुर्णवेळ संशोधन करण्याऱ्या  विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीसाठी २५ लाखाची तरतूद ही अर्थसंकल्पाची वैशिष्ट्ये आहेत. विद्यापीठ प्राधिकरण निवडणूकांसाठी ५० लाखांची तरतूद करण्यात आली आहे. अर्थसंकल्पात परिरक्षणासाठी २०६.१२ कोटी रूपये, योजनांतर्गत विकासासाठी ५८.२९ कोटी आणि विशेष कार्यक्रमांसाठी / योजनांसाठी ४२.३६ कोटी अशी एकूण खर्चासाठी ३०६.७७ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. या अर्थसंकल्पात उत्पन्नासाठी तरतूद २७२.८६ कोटी इतकी असल्यामुळे रूपये ३३.९१ कोटी इतक्या तुटीचा हा अर्थसंकल्प आहे. खर्चात बचत करून ही तुट भरून काढण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला आहे.

 

विद्यापीठात शिक्षण घेणारे बहुतांश विद्यार्थी हे ग्रामीण व आदिवासी भागातील असून त्यांच्या महाविद्यालयीन शिक्षणासाठी आवश्यक त्या सोयी सुविधा पुरवत व उच्च शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना केंद्रबिंदू मानून विकासाला चालना देणारा हा अर्थसंकल्प मांडण्यात आला. विद्यापीठाच्या विविध शैक्षणिक प्रशाळातील विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेअंतर्गत पूर्णवेळ पीएच.डी. करणाऱ्या संशोधक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना सुरु करण्यात आली असून त्यासाठी २५ लाखाची तरतूद ठेवण्यात आली आहे.  विद्यापीठात अल्पसंख्यक सेवा कक्ष सुरु करण्यात आला असून त्यासाठी ५ लाख, स्वातंत्र्यदिनाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त उद्यान विकास व सुशोभिकरणासाठी वाढीव २० लाख, कर्मचारी संशोधन प्रोत्साहन योजनेसाठी ५ लाखावरुन १५ लाख, महाविद्यालयांना अंतर्गत परिषदा आयोजित करण्यासाठी ३०‍लाखावरुन ४० लाख अशी वाढीव तरतूद करण्यात आली आहे.  विद्यार्थी कल्याण विभागांतर्गत विविध ३७ योजनांसाठी या अर्थसंकल्पात ६ कोटी ९३ लाख तरतूद आहे. तर विद्यापीठातील वसतिगृह बांधकाम व दुरुस्तीसाठी ५० लाखावरुन १ कोटी, युवती सभेसाठी १.५ लाखावरुन २० लाख तरतूद केली आहे. तर क्रिडा विकासासाठी या अर्थसंकल्पात १ कोटी ५३ लाख अशी भरीव तरतूद आहे.  खान्देशातील लोककलांना प्रोत्साहन देण्यासाठी यंदा प्रथमच अण्णाभाऊ साठे लोककला महोत्सव घेतला जाणार असून त्यासाठी ५ लाख रुपये ठेवण्यात आले आहे.  सावित्रीबाई फुले जयंतीदिनी सावित्रीबाई फुले प्रथम शिक्षीत महिला पुरस्कार या वर्षापासून दिला जाणार आहे.  त्यासाठी ५ लाखाची तरतूद आहे. विद्यापीठांतर्गत महाविद्यालयीन पदव्युत्तर विद्यार्थ्यांना शिकविण्याचा अनुभव यावा यासाठी संशोधन करणाऱ्या विद्यार्थ्यांस शिक्षण सहाय्य म्हणून दरमहा १० हजार रुपये देण्याची योजना दोन वर्षांपूर्वी सुरु करण्यात आली.  दोन विद्यार्थ्यांना त्याचा लाभ देण्यात आला असून याही अर्थसंकल्पात ही योजना कायम ठेवण्यात आली आहे.  आंतर विभागीय संशोधन प्रकल्प राबविण्यासाठी प्रोत्साहनपर संशोधन योजनेसाठी ५० लाखांची तरतूद कायम आहे.  राजीव गांधी विज्ञान व तंत्रज्ञान आयोगाच्या सहकार्याने विद्यापीठाकडून ग्रामीण भागात सिलेज प्रकल्प राबवला जात आहे.  या प्रकल्पात नवीन योजना तयार करण्यासाठी ५ कोटींची तरतूद आहे.

 

विद्यापीठ प्रशाळा व उपकेंद्र यासाठी १४.५६ कोटी तरतूद असून प्रशाळांतर्गत प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरु करण्याचे प्रस्तावित आहे. वसतिगृहासाठी ६१ लाख, ज्ञानस्त्रोत केंद्रासाठी ३० लाख, आरोग्य केंद्रासाठी २३ लाख, आजीवन अध्ययन विभागासाठी २१ लाख, विविध इमारत व बांधकाम विकासासाठी ३४.२२ कोटी, प्रशाळा उपककरण खरेदीसाठी ५.५७ कोटी अशी तरतूद आहे.

 

व्यवस्थापन परिषद सदस्य दीपक पाटील यांनी अर्थसंकल्प मांडल्यानंतर त्यावर चर्चा झाली. या चर्चेत प्रा.एकनाथ नेहेते, प्रा.गौतम कुवर, विष्णू भंगाळे, दिलीप पाटील, प्राचार्य एल.पी.देशमुख, नितीन ठाकूर, मनिषा चौधरी, दिनेश नाईक, अमोल मराठे यांनी भाग घेतला. प्रा. नेहेते व अमोल मराठे यांनी दिलेली कपात सूचना चर्चेअंती समाधान झाल्यामुळे मागे घेतली.

Protected Content