Home Cities जळगाव औट्रम घाटात बोगदा, केंद्राचा बांधकामाला हिरवा कंदील : खासदार स्मिता वाघ

औट्रम घाटात बोगदा, केंद्राचा बांधकामाला हिरवा कंदील : खासदार स्मिता वाघ


जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । धुळे–सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील औट्रम घाट हा राज्यातील सर्वात अवघड व धोकादायक घाट म्हणून ओळखला जातो. या घाटावरून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांना अपघात, वाहतूक कोंडी आणि विलंबाचा सामना करावा लागत होता. अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर आता केंद्र सरकारने ५.५० किलोमीटर लांबीच्या बोगद्याच्या बांधकामाला हिरवा कंदील दिला आहे. या अत्याधुनिक प्रकल्पावर ₹२,४३५ कोटी खर्च होणार असून, टेलवाडी ते बोधरे या सुमारे १५ किलोमीटरच्या टप्प्यात हा बोगदा उभारला जाणार आहे.

या बोगद्यामुळे संभाजीनगर–पुणे दरम्यानचा प्रवास वेळ मोठ्या प्रमाणात कमी होणार असून, अपघातांचे प्रमाण घटेल. या निर्णयामुळे मराठवाडा आणि खान्देश विभागातील वाहतूक अधिक सुरक्षित, जलद आणि सुलभ होणार आहे. हा प्रकल्प महाराष्ट्राच्या पायाभूत विकासाच्या प्रवासातील एक ऐतिहासिक पाऊल ठरणार आहे.

“औट्रम घाट आता इतिहासजमा होणार” : खासदार स्मिता वाघ
खासदार स्मिता वाघ म्हणाल्या, “औट्रम घाटात अनेक अपघात झाले, वाहतूक कोंडीमुळे नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत होता. सुरक्षित बोगदा उभारावा, ही जनतेची मागणी होती. त्यासाठी वारंवार केंद्रीय पातळीवर पाठपुरावा केला गेला. अखेर केंद्र सरकारने या भव्य प्रकल्पाला मंजुरी दिली आहे. हा निर्णय महाराष्ट्राच्या विकास प्रवासातील ऐतिहासिक टप्पा ठरेल.”

खासदार वाघ यांनी पुढे सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदृष्टीमुळे राज्यातील महामार्गांचे आधुनिकीकरण झपाट्याने सुरू आहे. या बोगदा प्रकल्पामुळे इंधन बचत, वेळेची बचत, अपघातांमध्ये घट आणि पर्यावरणावरचा ताण कमी होईल, असा त्यांचा विश्वास आहे.

या प्रकल्पासाठी सातत्याने पाठपुरावा माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, माजी केंद्रीय मंत्री भागवत कराड, खासदार स्मिता वाघ आणि आमदार मंगेश चव्हाण यांनी केला. केंद्र सरकारच्या या ऐतिहासिक निर्णयाबद्दल सर्वांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे आभार मानले आहेत.

प्रकल्पाचे तांत्रिक तपशील : बोगद्याची लांबी: ५.५० किलोमीटर, रस्त्याचा विस्तार: टेलवाडी ते बोधरे (१५ किलोमीटर)
एकूण प्रकल्प खर्च: ₹२,४३५ कोटी, वाहन वेग: ताशी १०० किलोमीटरपर्यंत, रचना: डबल ट्यूब स्ट्रक्चर, अत्याधुनिक वायुवीजन व आपत्कालीन मार्ग, सुरक्षा सुविधा फायर सिस्टिम, डिजिटल सेन्सर, सीसीटीव्ही, वाहन नियंत्रण केंद्र

या निर्णयामुळे खान्देश आणि मराठवाडा विभागातील प्रवासाचा नवा अध्याय सुरू होणार असून, औट्रम घाटाचा त्रासदायक प्रवास आता इतिहासजमा होणार आहे.


Protected Content

Play sound