सुट्टीतही वाचनाचा ध्यास! भगीरथ इंग्लिश स्कूलमध्ये उपक्रम उत्साहात


जळगाव–लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । दिवाळीच्या सुट्टीत बहुतेक विद्यार्थी विश्रांतीचा आनंद घेत असताना कै. सुनीता जगन्नाथ वाणी भगीरथ इंग्लिश स्कूलने विद्यार्थ्यांसाठी एक आगळावेगळा उपक्रम राबवला. ‘हसत खेळत वाचनाचा करूया ध्यास… सुट्टीचा करूया अभ्यास’ या नावाने राबविण्यात आलेल्या उपक्रमात विद्यार्थ्यांनी खेळतानाच वाचनाची गोडी लावण्याचा अनोखा अनुभव घेतला.

या विशेष उपक्रमात इयत्ता ९ वी आणि १० वीच्या विद्यार्थ्यांचा सहभाग होता. शाळेच्या मैदानावर विद्यार्थ्यांनी खेळांच्या माध्यमातून शिक्षणाशी जोडलेलं वाचन कसं आनंददायी होऊ शकतं, याचा अनुभव घेतला. शाळेतील उपक्रमशील आणि आदर्श शिक्षक किरण पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत सांगितलं की, “सुट्टीचा काळ हा फक्त विश्रांतीसाठी नसून, ज्ञान वाढविण्याची संधी आहे. खेळताना वाचन केल्याने मन प्रसन्न राहते आणि अभ्यास अधिक लक्षात राहतो.”

या उपक्रमात दीपाली इंगळे, हेतल अहिरे, अर्चना ठाकूर, मिनाक्षी चौधरी, देवयानी मोरे, प्रांजली रंधवे, अनुष्का शिंपी, प्राची पाटील, नेत्रा पाटील, मयुरी कोळी, स्पर्श पाटील आणि समीक्षा सुरडकर या विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेतला. विद्यार्थ्यांनी सांगितले की, मैदानावर खेळतानाही वाचनाचा आनंद घेता आला आणि त्यामुळे अभ्यास अधिक सोपा व रंजक वाटला. अनेक विद्यार्थ्यांनी म्हटले की, “सुट्टीतही आम्ही वाचन सुरू ठेवणार आणि आमचा अभ्यास पूर्ण करणार.”

विद्यार्थ्यांनी शिक्षक किरण पाटील यांचे मनःपूर्वक आभार मानले की, सुट्टीत शाळेत येऊन त्यांनी सर्वांना प्रोत्साहन दिलं आणि अभ्यासाबरोबरच वाचनाची गोडी वाढवली. मुख्याध्यापक एस. पी. निकम, उपमुख्याध्यापक जे. एस. चौधरी आणि पर्यवेक्षक के. आर. पाटील यांनी या उपक्रमाचे कौतुक करत सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. त्यांनी म्हटले की, “सुट्टीच्या काळात वाचन आणि अभ्यासाचा समतोल राखणं हे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे.”

या अभिनव उपक्रमामुळे विद्यार्थी केवळ अभ्यासातच नव्हे तर आत्मशिस्त, वेळेचे नियोजन आणि सकारात्मक दृष्टिकोन या गुणांमध्येही समृद्ध झाले आहेत. सुट्टीचा उपयोग करताना शिक्षणाचा ध्यास घेण्याचा हा भगीरथ शाळेचा प्रयत्न इतर शाळांसाठी प्रेरणादायी ठरला आहे.