
फैजपूर : लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । अमेरिकेतील शिकागो शहरातील पॅलेटाईन येथील स्वामीनारायण मंदिरात नववर्षाच्या स्वागताच्या निमित्ताने दीपोत्सव आणि 1000 पदार्थांचा भव्य अन्नकूट महोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. या प्रसंगी हजारो भक्तांनी दर्शन आणि महाप्रसादाचा लाभ घेत नववर्षाची मंगल सुरुवात केली.
वडतालधाम पॅलेटाईन स्वामीनारायण मंदिरात वर्षभरातील सर्व धार्मिक कार्यक्रम आणि उत्सव गुरु श्री धर्मप्रसाददासजी यांच्या आशीर्वादाने आणि श्री भक्तिप्रकाशदासजी यांच्या मार्गदर्शनाखाली साजरे केले जातात. शास्त्री धर्मप्रकाशदास आणि शास्त्री मुक्तप्रकाशदास यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित या सोहळ्यात भक्तीभावाने न्हाऊन निघालेल्या भाविकांनी मंदिर परिसर भक्तिरसाने भरून टाकला.
सनातन संस्कृती आणि धर्माचे मूल्य लहान मुलांमध्ये रुजविण्यासाठी दर रविवारी मंदिरात ‘संस्कार केंद्र’ चालवले जाते. या माध्यमातून भारतीय संस्कार, भक्ती आणि कुटुंब मूल्ये पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचविण्याचे कार्य येथे सातत्याने केले जाते.
यंदाही वाघबारसपासून नववर्षापर्यंतच्या सर्व सणांचा उत्साहाने उत्सव साजरा करण्यात आला. गौपूजन, कालीचौदसला हनुमान पूजन, दिवाळीच्या दिवशी लक्ष्मी पूजन आणि नववर्षाच्या दिवशी 1000 पेक्षा अधिक पदार्थांचा अन्नकूट सादर करण्यात आला. सर्व पदार्थ मंदिरातील सत्संगी बहिणींनी अत्यंत भक्तीभावाने आणि पवित्रतेने मंदिरातच तयार केले.
या प्रसंगी चार वेदांच्या मंत्रोच्चारांनी नववर्षाचा प्रारंभ करण्यात आला. दिवसभर मंदिरात भक्तांचा ओघ कायम होता. भक्तांनी दर्शन आणि महाप्रसादाचा लाभ घेत आपल्या जीवनात शुभारंभ केला. प.पू.ध.धु. 1008 आचार्यश्री राकेशप्रसादजी महाराज, गुरु श्री धर्मप्रसाददासजी आणि श्री भक्तिप्रकाशदासजी यांनी या प्रसंगी थेट आशीर्वचन देत भक्तांना अध्यात्म, संस्कार आणि सेवाभावाचे महत्त्व अधोरेखित केले.
संपूर्ण कार्यक्रमाचे संचालन शास्त्री धर्मप्रकाशदास आणि शास्त्री मुक्तप्रकाशदास यांनी केले. मंदिर सेवा समितीचे अध्यक्ष सुभाषभाई, स्नेहलभाई, हितेशभाई, अर्जुनभाई, विनोदभाई, धर्मभाई, केयुरभाई, सुभाषभाई (मोठे) तसेच असंख्य भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. भक्तिभाव, सेवा आणि संस्कृती यांचे दर्शन घडवणारा हा अन्नकूट उत्सव अमेरिकेतील भारतीय समाजासाठी नववर्षाचे विशेष आकर्षण ठरला.



