
जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जागतिक पांढरी काठी दिन आणि दिवाळीचा सण या दोन्हींच्या अनुषंगाने मानवतेचा दीप उजळणारा उपक्रम जळगावात पार पडला. नोडा मुंबई संस्थेच्या वतीने जिल्ह्यातील शंभर प्रज्ञाचूक्ष आणि दिव्यांग बांधवांना दिवाळी फराळ व भेटवस्तूंचे वाटप करण्यात आले. इंडियन रेडक्रॉस सोसायटी जळगाव येथे आयोजित या कार्यक्रमाला समाजातील अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली.
या उपक्रमासाठी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, आमदार राजू मामा भोळे, जैन उद्योगसमूहाचे अध्यक्ष अशोक जैन, भाजप जिल्हा सरचिटणीस डॉ. केतकी पाटील, श्री साई संस्थान अध्यक्ष सुनील झवर आणि उद्योजक सागर चौबे यांच्या सहकार्याने हा उपक्रम राबविण्यात आला. प्रज्ञाचूक्ष बांधवांना दिवाळी फराळासोबत स्टीलचा डबा, ड्रायफ्रूट्स आणि मिठाई वाटप करण्यात आली.
कार्यक्रमात इंडियन रेड क्रॉस सोसायटीच्या संचालिका मंगला ठोंबरे, भाजप आरोग्यदूत पितांबर भावसार, भाजप महानगर उपाध्यक्ष उदय भालेराव, प्रसिद्धी प्रमुख मनोज भांडारकर, आरोग्यदूत मनोज जंजाळ, शिवाजी पाटील आणि डॉ. क्षितिज भालेराव यांची उपस्थिती लाभली. याप्रसंगी डॉ. ठोंबरे यांनी प्रज्ञाचूक्ष बांधवांना प्रोत्साहनपर मार्गदर्शन केले. तसेच पितांबर भावसार आणि मनोज भांडारकर यांनी मनोगत व्यक्त करत मंत्री गिरीश महाजन, आमदार सुरेश भोळे आणि डॉ. केतकी पाटील यांच्या वतीने दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमात प्रज्ञाचूक्ष बांधव वाल्मीक सावंत याने सुंदर गीत सादर करून वातावरण आनंदमय केले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संघटनेचे सदस्य मंगेश शेवाळे, समाधान पाटील, सोपान पाटील, जयेश पाटील आणि नोडा ऑर्गनायझेशनच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन किशोर गोसावी यांनी केले तर आभार मंगेश शेवाळे यांनी मानले.



