Home Cities जळगाव गोदावरी अभियांत्रिकी संस्थेत वाचन प्रेरणा दिन उत्साहात साजरा

गोदावरी अभियांत्रिकी संस्थेत वाचन प्रेरणा दिन उत्साहात साजरा


जळगाव–लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । भारताचे माजी राष्ट्रपती व भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त गोदावरी अभियांत्रिकी आणि तंत्रनिकेतन महाविद्यालयात ‘वाचन प्रेरणा दिन’ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने विद्यार्थ्यांसाठी वकृत्व आणि वाचन स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रमाचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी अधिष्ठाता डॉ. तुषार कोळी, सर्व विभागप्रमुख, प्राध्यापक वर्ग आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. डॉ. पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, “वाचन ही केवळ सवय नसून ती व्यक्तिमत्त्व विकासाची पायरी आहे. वाचनामुळे विचारांची दारे उघडतात, आत्मविश्वास वाढतो आणि सृजनशीलतेला दिशा मिळते.”

वकृत्व आणि वाचन स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. वाचन प्रेरणा स्पर्धेत संजना गवई (द्वितीय वर्ष ई अँड टीसी) हिने प्रथम, तर श्रद्धा मराठे हिने द्वितीय क्रमांक पटकावला. वकृत्व स्पर्धेत रिद्धी भिरूड (प्रथम वर्ष संगणक) हिने प्रथम, आणि रुचिका पाटील (प्रथम वर्ष आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड डाटा सायन्स) हिने द्वितीय क्रमांक मिळवला. विजेत्या विद्यार्थ्यांना प्राचार्य डॉ. पाटील यांच्या हस्ते ट्रॉफी प्रदान करण्यात आल्या.

महाविद्यालयातील विविध विभागांमध्ये प्रेरणादायी साहित्याचे प्रदर्शन ठेवण्यात आले होते, ज्याचा विद्यार्थ्यांनी मनसोक्त लाभ घेतला. कार्यक्रमाचे आयोजन प्रा. नकुल गाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. त्यांना प्राध्यापकवर्ग आणि विद्यार्थ्यांचे उत्स्फूर्त सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे पर्यवेक्षक म्हणून प्रा. शिरीन पिंजारी, प्रा. किरण बाविस्कर आणि प्रा. राजनंदिनी चौधरी यांनी जबाबदारी पार पाडली, तर सूत्रसंचालन भूमिका चौधरी (प्रथम वर्ष संगणक) हिने केले.

गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. उल्हास पाटील, सचिव डॉ. वर्षा पाटील, सदस्य डॉ. केतकी पाटील, डॉ. वैभव पाटील (डीएम कार्डिओलॉजिस्ट) आणि डॉ. अनिकेत पाटील यांनी या उपक्रमाचे कौतुक केले.


Protected Content

Play sound