गुजरात मंत्रिमंडळात मुख्यमंत्री वगळता सर्व मंत्र्यांचे एकत्रित राजीनामे


गांधीनगर – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज वृत्तसेवा । दिवाळीच्या तोंडावर गुजरातच्या राजकारणात मोठा भूकंप झाल्याचे चित्र आहे. मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल वगळता संपूर्ण मंत्रिमंडळाने अचानक राजीनामा दिल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. भाजपच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात बदल होणे म्हणजे पक्षाची आगामी निवडणुकांसाठीची रणनीती आणि अंतर्गत नाराजी दूर करण्याचा प्रयत्न असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. विशेष म्हणजे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज रात्रीच गुजरातमध्ये दाखल होत असून, उद्या नवीन मंत्रिमंडळाचा शपथविधी होणार आहे.

गुजरातमधील सध्याच्या मंत्रिमंडळात मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्यासह 17 मंत्री होते. यामध्ये आठ कॅबिनेट दर्जाचे मंत्री आणि आठ राज्यमंत्री होते. परंतु 16 ऑक्टोबरच्या संध्याकाळी मुख्यमंत्री निवासस्थानी झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीनंतर सर्व मंत्र्यांनी एकमुखाने राजीनामे दिले. हे राजीनामे आधीच तयार होते आणि त्यावर स्वाक्षऱ्याही होत्या, अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे. या बैठकीनंतर राजीनाम्यांची प्रत राज्यपाल देवव्रत आचार्य यांच्याकडे सादर केली जाणार आहे.

या राजीनाम्यांच्या पार्श्वभूमीवर भाजपने मोठा निर्णय घेतला असून, उद्या म्हणजे 17 ऑक्टोबर रोजी नव्या मंत्र्यांचा शपथविधी सोहळा होणार आहे. यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा उपस्थित राहणार आहेत. त्याआधी आज रात्री 9 वाजता अमित शाह गुजरातमध्ये पोहोचणार आहेत, तर नड्डा उद्या सकाळी येणार आहेत. राष्ट्रीय संघटनेचे सरचिटणीस सुनील बन्सल हे देखील गुजरातच्या दौऱ्यावर आहेत.

सूत्रांच्या माहितीनुसार, नव्या मंत्रिमंडळात काही मोठे चेहरे आणि नवीन सामील झालेले नेते दिसणार आहेत. काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केलेले अर्जुन मोढवाडिया, अल्पेश ठाकोर, हार्दिक पटेल आणि सी. जे. चावडा यांना मंत्रिपद दिले जाऊ शकते. सौराष्ट्रातील जयेश राडाडिया आणि जितू वाघानी यांना देखील मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे. तसेच उत्तर गुजरातमधील पाटीदार आणि ठाकोर समाजाचे प्रतिनिधित्व वाढवले जाणार आहे.

या मंत्रिमंडळ फेरबदलाच्या मागे पक्षाची आगामी विधानसभा निवडणुकांची रणनीती असल्याचे स्पष्टपणे दिसते. 2022 मध्ये भूपेंद्र पटेल यांनी दुसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. त्यानंतर तीन वर्षांमध्ये एकदाही मंत्रिमंडळात मोठा फेरबदल झालेला नव्हता. मात्र, विसावदर पोटनिवडणुकीत आम आदमी पक्षाच्या उमेदवाराने विजय मिळविल्याने भाजपला धक्का बसला. मुख्यमंत्री, भाजप प्रदेशाध्यक्ष आणि वरिष्ठ नेत्यांनी मोर्चा सांभाळूनही पराभव पत्करावा लागल्याने नाराजीचा सूर दिसून आला.

ही नाराजी आणि सत्ताविरोधी लाट थोपवण्यासाठी भाजपने आताच मंत्रिमंडळ बदलाचे पाऊल उचलले आहे. अनेक मंत्री हायकमांडच्या अपेक्षा पूर्ण करण्यात कमी पडल्याचेही वृत्त आहे. त्यामुळे आता अशा मंत्र्यांना बाहेरचा रस्ता दाखवून, नव्या चेहऱ्यांना संधी देण्याचा निर्णय पक्षाने घेतला आहे. काही जुने दिग्गज नेते, जे सध्या सक्रिय राजकारणातून थोडेसे दूर आहेत, त्यांनाही पुन्हा महत्त्वाची जबाबदारी दिली जाण्याची शक्यता आहे.

गुजरातमधील राजकीय परिस्थिती पाहता, नरेंद्र मोदींच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळापासून राज्यात सातत्याने नेतृत्व बदल होत आले आहेत. आधी आनंदीबेन पटेल, नंतर विजय रुपाणी आणि आता भूपेंद्र पटेल सरकारमध्ये मोठे फेरबदल, हे सर्व पक्षाच्या अंतर्गत रणनीतीचा भाग असल्याचे दिसते. मात्र, या बदलांमुळे भाजपला आगामी 2027 विधानसभा निवडणुकीत फायदा होईल का, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.