लॉकडाऊनच्या काळात जळगाव जिल्ह्यात बालविवाहाचे 28 टक्के प्रमाण

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । बालविवाह ही जागतिक समस्या आहे. कोरोना काळात लॉकडाऊनमध्ये जळगाव जिल्ह्यात 28 टक्के बालविवाह झाल्याचे निदर्शनास आले असून बालविवाह रोखण्यासाठी जनजागृतीसह धोरणात्मक बदल करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन युनिसेफच्या माध्यम सल्लागार डॉ.सरिता शंकरन् यांनी व्यक्त केले.

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या जनसंवाद आणि पत्रकारिता विभाग आणि युनिसेफ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘बालविवाह प्रतिबंध आणि युवकांचा सहभाग’ या विषयावरील वेबसंवादात त्या बोलत होत्या.

पुढे बोलताना डॉ.सरिता शंकरन् म्हणाल्या की, ग्रामीण भागात किंवा अशिक्षित कुटुंबामध्ये बालविवाहाचे प्रमाण दिसून येते. त्यामुळे बालविवाह कायदा आणि बालकांच्या मूलभूत हक्कांचे उल्लंघन होते. बालविवाह रोखण्याची जबाबदारी ही केवळ शासन, प्रशासनाचीच नव्हेतर समाजातील सर्वच घटकांची आहे. त्यामुळे जनजागृतीसाठी माध्यमांसह माध्यमांसह युवकांचा सहभाग अतिशय महत्वाचा असल्याचेही त्यांनी नमूद केले. जळगाव जिल्ह्यात काही स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने बालविवाह विरोधी जनजागृती करण्यासाठी काही वर्षापासून काम सुरू आहे. बालविवाह रोखण्याच्या कार्यात युवकांचा मोठ्या प्रमाणात सहभाग असला तरी यात अजून अधिक संख्येने युवकांनी सहभागी होणे गरजेचे असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

अध्यक्षीय मनोगतात डॉ. अनिल चिकाटे यांनी, भारतात तसेच महाराष्ट्रात बालविवाहाचा प्रश्न अतिशय गंभीर आहे. बालविवाह रोखण्यासाठी कायदे असूनही कायद्याचे उल्लंघन असल्याची खंत व्यक्त करत बालविवाहाच्या होण्याच्या अनेक कारणांवर त्यांनी प्रकाश टाकला. प्रास्ताविकात विभागप्रमुख डॉ.सुधीर भटकर यांनी बालविवाहामुळे अनेक समस्या निर्माण होतात. बालविवाह रोखण्यासाठी युवकांचा सहभाग महत्वाचा असल्याची भूमिका त्यांनी विषद केली.

यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून कला व मानव्यविद्या प्रशाळेचे संचालक प्रा.डॉ. अनिल चिकाटे यांच्यासह मुख्य आयोजक जनसंवाद आणि पत्रकारिता विभागप्रमुख प्रा.डॉ. सुधीर भटकर, युनिसेफच्या माध्यम सल्लागार श्रुती गणपत्ये यांच्यासह डॉ.विनोद निताळे, डॉ.गोपी सोरडे, डॉ.सोमनाथ वडनेरे उपस्थित होते. वक्त्यांचा परिचय युनिसेफच्या माध्यम सल्लागार श्रुती गणपत्ये यांनी करून दिला. सूत्रसंचालन प्रेरणा पाटील हिने केले. आभार निकिता भोई हिने मानले. यशस्वितेसाठी रंजना चौधरी, प्रकाश सपकाळे, प्रल्हाद लोहार, तुषार महाजन, समाधान वाघ यांनी परिश्रम घेतले.

Protected Content