जळगाव (प्रतिनिधी) जिल्ह्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी राबवायचा उपाययोजनांचा भाग म्हणून जिलह्यात 24 जून ते 8 जुलै, 2020 या कालावधीत संशयित रुग्ण शोध पंधरवाडा राबविण्यात येणार आहे. या कालावधीत त्वरीत निदान, त्वरीत उपचार या तत्वावर रुग्णांवर आवश्यत ते उपचार करण्यात येणार आहे. जेणेकरुन जिल्ह्यातील मृत्युदर कमी होण्यास मदत होईल. अशी माहिती जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी दिली.
कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी केलेल्या व करावयाच्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा आढावा घेणेसाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात जिल्हाधिकारी श्री. राऊत यांच्या अध्यक्षतेखाली जिल्ह्यातील सर्व उपविभागीय अधिकारी, तहसिलदार, पोलीस निरीक्षक, गटविकास अधिकारी, मुख्याधिकारी नपा/नप, तालुका आरोग्य अधिकारी, वैद्यकिय अधिक्षक यांची Google Meet App द्वारे (दूरचित्रवाणी परिषदेच्या माध्यमातून) आढावा बैठक घेण्यात आली, यावेळी ते बोलत होते. बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन. पाटील, महापालिका आयुक्त सुमित कुलकर्णी, जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे अध्यक्ष तथा इंन्सिडंट कमांडट गोरक्ष गाडीलकर, अपर जिल्हाधिकारी प्रवीण महाजन, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण, निवासी उपजिल्हाधिकारी राहूल पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ दिलीप पाटोडे, उप जिल्हा निवडणूक अधिकारी तुकाराम हुलवळे, जिल्हा परिषदेचे उप मुख्य अधिकारी कमलाकर रणदिवे आदि उपस्थित होते. तर गुगल मीट ॲपद्वारे पोलीस अधिक्षक डॉ. पंजाबराव उगले यांच्यासह सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार व तालुकास्तरीय यंत्रणेचे अधिकारी उपस्थित होते.
यावेळी बोलतांना जिल्हाधिकारी म्हणाले की, आपल्याला जिल्ह्यातून कोरोनाला हद्दपार करावयाचे आहे. याकरीता केंद्रीय समितीने दिलेल्या सुचनांनुसार बाधित रुग्णांचे त्वरीत निदान होणे आवश्यक आहे. यासाठी ट्रेसिंग वाढविणे आवश्यक आहे. बाधित रुग्णाच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध तातडीने घेतल्यास त्याचे निदान होईल. रुग्णाचे निदान लवकर झाले तर त्याला उपचारही लवकर देता येईल. त्यामुळे रुग्ण लवकर बरा होईल व मृत्युचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल. याकरीता सर्व तालुकास्तरीय यंत्रणांनी 24 जून ते 8 जुलै या कालावधीत संशयित रुग्ण तपासणी मोहिम हाती घ्यावयाची आहे. या कालावधीत बाधित रुग्णाच्या संपर्काबरोबरच 50 वर्षावरील रुग्णांची तपासणी करावयाची आहे. नागरीकांमध्ये कोविडची लक्षणे आढळून आल्यास अशा व्यक्तींची स्वतंत्र नोंद ठेवण्याची सुचनाही त्यांनी केली. जेणेकरुन या व्यक्तींचे स्वॅब घेऊन ते तपासणीसाठी पाठविता येईल.
पुढील आठवड्यापासून जिल्ह्यात दिवसाला एक हजार स्वॅब तपासण्याची सुविधा निर्माण होणार
कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी संशयित रुग्णांच्या स्वॅब तपासणी तातडीने होणे आवश्यक आहे. याकरीता पुढील आठवड्यापर्यंत स्थानिक लॅबची क्षमता वाढविण्यात येणार आहे. शिवाय खाजगी लॅबच्या माध्यमातूनही स्वॅब तपासणी वाढविण्यात येणार आहे. याकरीता लागणारा निधी स्थानिक सामाजिक संस्था, लोकप्रतिनिधी व राज्य शासनाच्या विविध योजनांमधून उपलब्ध करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
संशयित रुग्णांची तपासणी करतांना पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कातील हाय रिस्क व लो रिस्कची माहिती घेऊन त्यांचा शोध घ्यावा. यासाठी केंद्रीय समितीने दिलेल्या सुचनांचे पालन करावे. शिवाय प्रतिबंधित क्षेत्राची अचूक आखणी करावी. बाधित रुग्णांचे संपर्क लक्षात घेऊन झोनची आखणी करा. झोनच्या सीमा सुरक्षित राहतील याची दक्षता पोलीस विभागाने घ्यावी. झोनचे निर्जतुकीकरण करणे, झोनमध्ये बाहेरील कोणी जाणार नाही याची दक्षता घेणे. तसेच हाय रिस्कमधील व लक्षणे आढहून येणारे कोणीही संशयित होम क्वारंटाईन राहणार नाही. संस्थात्मक विलगीकरण कक्षातील व्यक्तींना चहा, नाश्ता, जेवण वेळेवर मिळेल याची सर्व संबंधितांनी काळजी घेण्याच्या सुचनाही जिल्हाधिकारी यांनी यावेळी दिल्यात. अत्यावश्यक सेवेतील कोणीही डॉक्टर, अधिकारी, आरोग्य कर्मचारी गैरहजर राहणार नाही. साथरोग नियत्रण कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याच्या सुचनाही त्यांनी दिल्यात. गर्दी टाळण्यासाठी परवानगीशिवाय कुठलेही कार्यक्रम होणार नाही, सार्वजनिक ठिकाणी थुकण्यावर बंदी, मास्क न वापरणाऱ्यावर दंड करण्याच्या सुचनाही त्यांनी बैठकीत दिल्यात.
कोरोना योध्दांसाठी कॉल सेंटर सुरु करणार
अंगणवाडी सेविका, आशावर्कर, आरोग् ट्रेनर यांच्यासह क्षेत्रीयस्तरावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना काही अडचण आल्यास त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी कॉल सेंटर सुरु करण्याच्या सुचना त्यांनी जिल्हा शल्य चिकित्सकांना दिल्यात. जिल्ह्याच्या प्रमुख रस्त्यांवर चेकपोस्ट उभारण्यात आलेले आहे. तेथे पोलीस, परिवहन व महसुल विभागाच्या संयुक्त विद्यमाने बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. सदरच्या ठिकाणी असलेला बंदोबस्त हा ठरवून दिलेल्या आराखड्यानुसारच असणे आवश्यक आहे. बाधित रुग्णाच्या संपर्कातील व्यक्ती शोधण्यासाठी पोलीस यंत्रणेची आवश्यकता भासल्यास ती देण्यात येईल असे जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ पंजाबराव उगले यांनी सांगितले.
जिल्ह्यातून कोरोनाला हद्दपार करण्यासाठी ट्रेंसिंग वाढविणे आवश्यक आहे. ट्रेसिंग वाढले तर बाधित रुग्ण वाढणार आहे. बाधित रुग्णांवर आवश्यक ते उपचार करण्यासाठी प्रशासकीय व आरोग्य यंत्रणा सज्ज आहे. गेल्या काही दिवसातील जिल्ह्यातील रुगण बरे होण्याचा दर वाढला आहे. तसेच मृत्यु दर कमी करण्यासाठी प्रशासन आवश्यक त्या उपाययोजना राबवित आहे. त्यामुळे नागरीकांनी घाबरुन जाण्याचे कारण नाही. कोणालाही कोरोना सदृष्य लक्षणे आढळून येत असल्यास नागरीकांनी त्वरीत रुग्णालयात जाऊन तपासणी करुन घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी राऊत यांनी जिल्हावासियांना केले आहे.