जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । चोपडा तालुक्यात अवैध गौणखनिज उत्खनन व वाहतूक करताना जप्त करण्यात आलेली २३ वाहने आता लिलावाद्वारे विकली जाणार आहेत. ही वाहने जप्त करून चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये लावण्यात आली आहेत.
संबंधित वाहन मालकांना अवैध गौणखनिज उत्खनन व वाहतुकीबाबत दंडात्मक नोटिसा आणि आदेश देण्यात आले होते. मात्र, त्यांनी दंडाची रक्कम न भरल्यामुळे आता ही जप्त केलेली वाहने लिलावात काढली जाणार आहेत. या वाहनांवर जमीन महसुलाची थकबाकी समजून, नियमानुसार त्यांचा लिलाव करून त्यातून मिळणारा महसूल शासनाच्या तिजोरीत जमा करण्याची कार्यवाही केली जाणार आहे.
चोपडा तहसील कार्यालयात येत्या २३ मे २०२५ रोजी या वाहनांचा लिलाव होणार आहे. जप्त केलेल्या २३ वाहनांमध्ये ट्रॅक्टर आणि ट्रॉलींचा समावेश आहे. विभागाकडून जप्त वाहनांची यादी, वाहन क्रमांक, चेसिस नंबर, ट्रॉलीची माहिती आणि अंदाजित किंमत प्रसिद्ध करण्यात आली आहे. काही महत्त्वाच्या जप्त वाहनांमध्ये एमएच १८ बीआर १७२९, एमएच १८ एए ५७४७, एमएच १९ सीवाय ४९९३, एमएच १९ बीजी १४७५, एमएच १९ एएन ३३२९ यांचा समावेश आहे.
या जप्त वाहनांची सुनावणी आणि लिलाव प्रक्रिया २३ मे २०२५ रोजी चोपडा तहसील कार्यालयात होणार आहे. लिलावात इच्छुक असलेल्या व्यक्तींनी लिलावात भाग घेण्यासाठी अर्ज, लिलाव होणाऱ्या मालमत्तेची अंदाजित किंमत, अनामत रक्कम आणि लिलावाच्या अटी व शर्तींसाठी चोपडा तहसील कार्यालयाशी कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा, असे आवाहन चोपड्याचे तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.