पारोळा प्रतिनिधी । मतदारसंघात 58 ग्रामपंचायतच्या सार्वत्रिक निवडणुका होत आहे. या निवडणुकामध्ये गावागावात वाद होऊ नये, कोरोना माहामारी वाढू नये. म्हणून मतदारसंघात बिनविरोध निवडणूक करणाऱ्या गावाला ग्रामपंचायतला 21 लाखाचा विकासासाठी विकास निधी देण्याचा निर्णय आमदार चिमणराव पाटील यांनी जाहीर केला आहे.
माहे एप्रिल २०२० ते डिसेंबर २०२० या कालावधीत मुदत संपणाऱ्या व नव्याने स्थापित जळगांव जिल्ह्यासह महाराष्ट्रात सुमारे १४२३४ ग्रामपंचायतींचा निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. परंतु राज्यासह संपुर्ण विश्वात थैमान घातलेल्या कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव अजुन फारसा थांबलेला नाही. त्यामुळे कोरोना भयावह परिस्थितीत गेल्या मार्च महिन्यापासुन प्रशासनाचा सहकार्याने शासन सर्वोतोपरी प्रयत्न करून परिस्थिती योग्य प्रकारे हाताळत आहे. अशा कोरोना भयावह परिस्थितीत ग्रामपंचायत निवडणुकांचा बिगुल वाजला आहे. यावर मात करण्यासाठी निवडणुक काळात कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव वाढु नये, गावातील एकोपा टिकुन राहावा, कोरोनाचे संकट बळावू नये, कोरोनाशी लढण्यात व्यस्त असलेल्या प्रशासनावर ताण येऊ नये व निवडणुक खर्चाची बचत व्हावी म्हणुन एरंडोल विधानसभेचे आमदार चिमणराव पाटील यांनी एरंडोल विधानसभा मतदारसंघातील मुदत संपलेल्या व नव्याने स्थापित निवडणुकीसाठी पात्र असलेल्या ग्रामपंचायतींनी निवडणुक न होऊ देता बिनविरोध निवडणुक पार पाडतील अश्या ग्रामपंचायतींना त्यांचा स्थानिक आमदार निधी कार्यक्रमांतर्गत ग्रामपंचायत विकासासाठी २१लक्ष रूपये देणार असल्याचा निर्णय घेतला आहे.
तसेच कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी एरंडोल विधानसभा मतदारसंघातील जास्तीत जास्त ग्रामपंचायतींनी हा निर्णय आमलात आणावा असे आवाहन देखील यावेळी केले आहे. त्यांचा या निर्णयाचे ग्रामीण भागात कौतुक होत आहे. राज्यात आसा निर्णय घेणारे आमदार चिमणराव पाटील हे एकमेव द्वितीय ठरले आहेत.