जळगाव । जळगाव ग्रामीण मतदार संघातील जळगाव व धरणगाव तालुक्यातील १८२ किमी लांबीच्या ४७ योजनाबाह्य (शेती रस्ते) ग्रामीण मार्ग म्हणून मान्यता मिळाली आहे. पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या प्रयत्नांनी या रस्त्यांचा जिल्हा परिषद बांधकाम विभागा मार्फत विकास होणार असून यामुळे हजारो शेतकर्यांना याचा फायदा होणार आहे.
याबाबत वृत्त असे की, जळगाव ग्रामीण मतदार संघातील जळगांव व धरणगाव तालुक्यातील १८२ किमी लांबीच्या ४७ योजनाबाह्य (शेती रस्ते) ग्रामीण मार्ग म्हणून रस्ते विकास योजना २००१ – २०२१ मध्ये समाविष्ट होण्यासाठी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी परिपूर्ण प्रस्ताव बनवुन केलेल्या पाठपुराव्यामुळे राज्य शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने या रस्त्यांना ग्रामीण मार्ग म्हणुन घोषित केले आहे. शेतकरी केंद्रबिंदू मानून शेतकर्यांसाठी रस्ते हा विकास कामांमधील सर्वात अविभाज्य घटक मानून मतदारसंघातील प्रत्येक गावाला जोडणारा रस्ता हा अतिशय दर्जेदार असावा यासाठी ना.गुलाबराव पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे १८२ किमीच्या या रस्त्यांचे जिल्हा परिषद बांधकाम विभागा मार्फत विकास होण्याचा मार्ग सुकर झाला आहे. त्यामुळे हजारो शेतकर्यांना याचा फायदा होणार आहे.
प्रतापराव पाटील यांनी ठराव केला मंजूर
दरम्यान, जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत रस्त्यांच्या विकासासाठी जि.प. सदस्य प्रतापराव पाटील यांनी या संबंधी आवाज उठवून ठराव मंजुर करून घेतला होता. या रस्त्यांवरील गावांची संख्या, लोकसंख्या व रस्त्यांवर होणारा वापर तसेच जिल्हा परिषदेचा ठराव विचारात घेऊन शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने या ४७ रस्त्यांच्या १८२ किमीला ग्रामीण मार्ग म्हणून दर्जोन्नती करण्यास मंजुरी दिली असून रस्ते विकास योजना २००१-२०२१ मध्ये समाविष्ट करण्यात आले आहे.
हजारो शेतकर्याना होणार फायदा !
मोठे, मध्यम व लहान शेतकरी हे विविध पिकांचे फळ भाज्यांचे तसेच कापसाचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन घेतात मात्र शेतीचे म्हणजे योजना बाह्य रस्त्यांच्या विकासा अभावी शेतमाल बाजार पेठेत येईपर्यंत खराब होतो तसेच मालाची वाहतूक मोठया वाहनांऐवजी बैल गाडीने करावी लागत असल्याने बैलही जखमी होतात. शेतात जाण्यासाठी मजूर वर्गही फारसा उत्सुक नसतो. प्रसंगी शेतकर्यांना मजुरांसाठी जास्त किंमत मोजावी लागते. खराब रस्त्यांमुळे शेतकरी रात्री – बेरात्री शेतात जाऊ शकत नाही. केवळ शेत रस्ते नसल्याने शेतकर्यांच्या उत्पन्नावर विपरीत परिणाम होत असल्यामुळे शेतकर्यांना मोठया प्रमाणात आर्थिक व मानसिक दृष्टया त्रास सहन करावा लागतो. याच अडचणींची दखल घेऊन ना.गुलाबराव पाटील यांनी मतदार संघातील योजनाबाह्य म्हणजे शेतीचे दोन गावांना जोडणारे रस्त्यांना ग्रामीण मार्ग म्हणून मंजूर केले त्यामुळे मतदार संघातील हजारो शेतकर्यांना दिलासा मिळाला आहे.
या शेती रस्त्यांचा समावेश
धरणगाव तालुक्यातील दोनगाव खू. ते ग्रा.मा.१७, चांदसर ते ग्रामा ४३ , कल्याणे होळ ते रामा ६, बांभोरी बु. ते प्रजिमा ५०, धरणगाव ते सार्वे, अहिरे बुद्रुक ते अहिरे खुर्द, तरडे ते पष्टाने खू., बोरगाव ते विवरा, भोणे (लक्ष्मीनारायण मंदिर ) ते बिलखेडा , श्याम खेडा ते धरणगाव, साकरे ते सोनखडी, चोरगाव ते फुपनी, धार ते शेरी, अंजनविहीरे ते खामखेडा ते ५० , जांभोरा ते ग्रामा ४६, ग्रामा १७ ते दोनगाव बु. ते जळगाव तालुका हद्द, चमगाव ते उखलवाडी अश्या ६३.५०० किलोमीटरच्या १७ रस्त्यांना ग्रामीण मार्ग म्हणून दर्जोन्नती मिळाली आहे. तर जळगाव तालुक्यातील
फुपनगरी ते वडनगरी , भोकर ते कोळंबा , वडनगरी ते हिरवेवाट , देवगाव ते भोकर , जामोद ते बाबुळगाव , पळसोद ते बाबुळगाव, भादली खु ते कठोरा ते किनोद ते फुपनी, रामा ४२ ते फुपनगरी ते ममुराबाद, आव्हाने ते खेडी , नांद्रा ते धानोरा , डोणगाव ते महासावद रेल्वेगेट, ममुराबाद ते नांद्रा खु, पिलखेडे ते करंज, जवखेडा ते सामनेर, डोणगाव ते वडली, भादली ते पिंपरी (यावल तालुका हद्द), रा.म.मा.६ (मकरापार्क) ते तरसोद ते भादली बु, भादली भोलाने ते कानसवाडे, भादली (मंडमाई) असोदा, शेळगाव ते भालशिव (यावल तालुका हद्द ), भादली ते शेळगाव खु , कंडारी ते वाघुर नदीपर्यंत , देण्याचे सुनसगाव भादली ते भोलाने , कंडारी ते खादगाव (जामनेर तालुका हद्द ), शिरसोली प्र.न. ते सज्जनमियाँ धरण , रिधुर ते प्रजिमा ५८ , नांद्रा ते रिधुर, भादली ते शेळगाव, सावखेडा ते बिबानगर अश्या ११९ किमीच्या ३० रस्त्यांना दरजोन्नती प्राप्त झाली आहे. त्यामुळे जळगाव ग्रामीण मतदारसंघात एकूण १८२ किलोमीटर लांबीच्या ४७ रस्त्यांना दर्जोन्नती मिळाल्यामुळे रस्त्यांचा विकास होण्याचा मार्ग सुकर झाला आहे.
सार्वजनीक बांधका विभागाचे अधीक्षक अभियंता पी. पी. सोनवणे, कार्यकारी अभियंता विलास पाटील व उप अभियंता श्रेणी १ चे सुभाष राऊत यांनी परिपूर्ण प्रस्ताव तयार करून शासनाकडे विधानसभा निवडणुकीपूर्वी सादर केला होता. परिणामी रस्ते विकास योजना २००१ – २०२१ मधील जळगाव जिल्ह्यातील ग्रामीण मार्ग रस्त्यांच्या एकूण लांबीत १८१.५०० किमी ने वाढ होऊन एकूण लांबी (५९९९.४००+१८१.५००) म्हणजेच ६१८०.९०० की.मी. इतकी झाली आहे.