पहिल्या तिमाहीत १८ बँकांना ३२ हजार कोटींचा फटका

losses

नवीदिल्ली, वृत्तसंस्था | चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहित १८ सार्वजनिक बँकांमध्ये फसवणुकीच्या २,४८० घटना घडल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. या घटनांमुळे तब्बल ३२,००० कोटींचा फटका बँकांना बसला आहे. यामध्ये सर्वाधिक नुकसान स्टेट बँक ऑफ इंडियाचे झाल्याची माहिती रिझर्व्ह बँकेने माहिती अधिकारातील (आरटीआय) एका अर्जाला उत्तर देताना म्हटले आहे.

 

माहिती अधिकार कार्यकर्ते चंद्रशेखर गौड यांनी आरबीआयकडे आरटीआयअंतर्गत अर्ज दाखल करुन चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत झालेल्या बँक फसवणुकीच्या घटनांची आकडेवारी मागवली होती. या अर्जाला उत्तर देताना आरबीआयने जी आकडेवारी समोर ठेवली आहे, ती धक्कादायक आहे. कारण, एप्रिल महिन्यापासून सुरु झालेल्या या अर्थिक वर्षातील पहिल्या तिमाहित म्हणजेच ऑगस्टपर्यंतच्या चार महिन्यांच्या कालावधीत १८ सार्वजनिक बँकांमध्ये तब्बल २४८० फसवणुकीच्या घटना समोर आल्या आहेत. या घटनांमध्ये बँकांचे एकूण ३१,८९८.६३ कोटी रुपये बुडाले आहेत. दरम्यान, गौड यांनी आरबीआयकडून बँकांच्या नुकसानीचे प्रमाणही जाणून घेण्याचा प्रयत्न केला मात्र, नुकसानीच्या प्रमाणातील डेटा आपल्याकडे उपलब्ध नसल्याचे आरबीआयने म्हटले आहे.

या फसवणुकीच्या घटनांमध्ये सर्वाधिक फसवणूक एसबीआयची झालेली आहे. या बँकेच्या एकूण ठेवींपैकी ३८ टक्के पैसे बुडाले आहेत. एकट्या एसबीआयमध्ये १,१९७ फसवणुकीच्या प्रकरणांची नोंद झाली आहे. यामध्ये या बँकेला १२,०१२.७७ कोटींचे नुकसान झाले आहे. यानंतर इलाहाबद बँकेमध्ये ३८१ फसवणुकीच्या घटनांची नोंद झाली असून या बँकेने २,८५५.६६ कोटी रुपये गमावले आहेत. पंजाब नॅशनल बँकेला (पीएनबी) २,५२६.५५ कोटी रुपयांना चुना लागला आहे. बँक ऑफ बडोदाला ७५ प्रकरणांध्ये २,२९७.०५ कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. तर ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्समध्य फसवणुकीच्या ४५ घटना समोर आल्या असून यामध्ये बँकेला २,१३३ कोटी रुपये गमवावे लागले आहेत. याशिवाय कॅनरा बँक, सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया, युनायटेड बँक ऑफ इंडिया या बँकांसह जवळपास सर्वच सरकारी बँकांना चालू अर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहित फसवणुकीला सामोरे जावे लागले आहे.

Protected Content