१०० कोटींमधून जळगावात होणार १६२ कामे !

जळगाव प्रतिनिधी । मुख्यमंत्र्यांनी मंजूर केलेल्या १०० कोटींतून करण्यात येणार्‍या १६२ कामांच्या यादीला विशेष महासभेने शनिवारी सर्वानुमते मंजुरी दिली. आता ही कामे लवकरात लवकर करण्यात यावीत हीच अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

महापालिकेची विशेष महासभा महापौर सीमा भोळे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. व्यासपीठावर उपमहापौर डॉ. अश्‍विन सोनवणे, आयुक्त चंद्रकांत डांगे उपस्थित होते. यात १६२ कामांना मंजुरी देण्यात आली. या कामांमध्ये गटार बांधणे (४७ कामे) १५.८७ कोटी रुपये, बगिचे व ओपन स्पेस विकसित करणे ( ४० कामे) ७.८२ कोटी रुपये, नाल्यास संरक्षण भिंत बांधणे (१३ कामे ) ७.०१ रुपये, स्मशानभूमी/ कब्रस्थान विकसित करणे (५ कामे ) १.४९ कोटी रुपये, समाजमंदिर बांधणे (३ कामे ) ९२ लाख रुपये, दुभाजक टाकणे (१ काम) ४ लाख रुपये, योगा हॉल/ जिम बांधणे (२ कामे) २ .६२ कोटी रुपये, रस्ते डांबरी करणे (४५ कामे) ६५.१० कोटी रुपये, मुतारी बांधणे (१ काम) १० लाख रुपये, शिवाजी पुतळा सुशोभिकरण करणे ( १ काम ) १० लाख रुपये, कुंपण भिंत बांधणे (१ काम) ३२.३६ लाख रुपये, पाइपलाइन व कुंपण करणे ( ३ कामे) २.१९ कोटी रुपये अशा प्रकारे तरतूद करण्यात आली आहे. यात अमृत योजनेसाठी रस्ते खोदलेल्या भागांमध्ये कामे होणार नसल्याचे महासभेत सांगण्यात आले आहे.

दरम्यान, राज्य शासनाने केवळ १०० कोटी निधी मंजूर केले आहे. परंतु, प्रशासनाने १०३ कोटी ५८ लाख रुपयांतून १६२ कामे करण्याचा प्रस्ताव दिला आहे. शासनाकडे तांत्रिकदृष्ट्या चुकीचा प्रस्ताव केल्यास मंजुरीस अडचणी येण्याची शंका नगरसेवक नितीन लढ्ढा यांनी व्यक्त केली. त्यावर आयुक्त डांगे यांनी शासनाकडे केवळ १०० कोटींचाच प्रस्ताव सादर करण्याची घोषणा केली. त्यामुळे उर्वरित साडेतीन कोटींच्या कामांबाबत संशयकल्लोळ निर्माण झाला आहे.

Add Comment

Protected Content