चाळीसगाव, प्रतिनिधी | शहराजवळील कोदगाव चौफुली येथून पिस्तुलाचा धाक दाखवून कापसाचा ट्रक चालकाच्या ताब्यातून पळवणाऱ्या आणि त्यातील सुमारे १४ टन कापूस चोरून नेणाऱ्या चार चोरट्यांना येथील शहर पोलिसांनी नुकतेच ताब्यात घेतले असून त्यांना आज (दि.३०) न्यायालयात हजर करण्यात आले आहे. अशी माहिती आज पोलिसांकडून पत्रकारांना देण्यात आली.
याबाबत अधिक माहिती अशी की, ट्रक चालक भगवान दगडूबा गव्हाड याने १८ मार्च २०१९ रोजी दिलेल्या फिर्यादीनुसार, तो आपल्या ताब्यातील ट्रक (क्र.एम.एच २०, इ.जी. ७१३५) १५ टन कापूस भरून आंबेलहोळ गावाकडे घेवून जात असताना कोदगाव चौफुलीजवळ ट्रक आला असता पांढऱ्या रंगाच्या मारुती ओम्नी किंवा इको सारख्या वाहनातून आलेल्या काही अज्ञात चोरट्यांनी गतिरोधकाजवळ त्यास अडवून पिस्तुलाचा धाक दाखवून त्यांना आपल्यासोबत वाहनात बसवले. त्यांच्या जवळील २० हजार रुपये हिसकावून घेत रात्रभर रस्त्यावर इकडे-तिकडे फिरवून सकाळी पुन्हा मालेगाव-धुळे रस्त्यावर उभ्या केलेल्या ट्रकजवळ सोडून दिले. त्यानंतर चोरटे पसार झाले होते.
याबाबत पोलीस तपास सुरु होता, त्यात हाती आलेल्या गुप्त माहितीनुसार शहर पोलिसांनी नुकतीच कारवाई करून पप्पू उर्फ प्रशांत गोटीराम दशपुते रा चिचगव्हाण ता मालेगाव, गोकळ संतोष पवार रा दहीवाड ता मालेगाव, हारुण इब्राहिम शेख रा चिचगव्हाण ता मालेगाव व दीपक सोनबावा रा दहीवाड ता मालेगाव यांना अटक करण्यात केली आहे. या गुन्ह्यातील तीन आरोपी अद्याप फरार आहेत. येथील शहर पोलिसांच्या शोध पथकातील पो.ना.अभिमन पाटील, विजय शिंदे, विनोद भोई, पो.कॉ. प्रविण सपकाळे, संदीप पाटील, दीपक पाटील, विनोद खैरनार, विजय पाटील, सतीश राजपुत, या पथकाने ही कारवाई केली असुन पुढील
तपास पोलीस निरीक्षक विजयकुमार ठाकुरवाड करीत आहेत.