पोलीस दलात नवीन 14 वाहने दाखल; पालकमंत्र्यांच्याहस्ते सुपूर्द (व्हिडीओ)

जळगाव प्रतिनिधी । जिल्हा नियोजन समितीकडून मिळणार्‍या निधीतून जिल्हा पोलिस दलाला 14 वाहने देण्यात आली. आज 2 एप्रिल रोजी ही वाहने पोलिस दलात समाविष्ट झाली असून पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत पोलीस मुख्यालयाच्या पोलिस कवायत मैदानावर छोटेखानी कार्यक्रमात वाहने पोलिस दलाकडे सुपूर्द करण्यात आली.

पोलिस दलात असलेली वाहने कालबाह्य झाल्याने तसेच त्यांच्या देखभाल दुरुस्तीसाठी अधिक पैसा खर्च होत असल्याने पोलिस दलाकडून जिल्हा नियोजन समितीकडे वाहनांसाठ पोलिस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी प्रस्ताव सादर केला होता. या प्रस्तावाला जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी तात्काळ मंजूरी देत पालकमंत्र्यांच्या मदतीने नवीन १४ वाहने खरेदी करण्यात आली आहे. आज ही सर्व वाहने पोलीस दलाकडे देण्यासाठी पोलिस कवायत मैदानावर छोटेखानी कार्यक्रम पार पडला. 

या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील उपस्थित होते. व्यासपीठावर महापौर जयश्री महाजन, आ. राजूमामा भोळे, आ. किशोर पाटील, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे, अपर पोलीस अधीक्षक चंदक्रांत गवळी, डीवायएसपी कमार चिंथा, आयुक्त सतिश कुलकर्णी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी केले. त्यानंतर जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी मनोगत व्यक्त करीत पोलीस दलास शुभेच्छा दिल्या. आभार अपर पोलिस अधीक्षक चंद्रकांत गवळी यांनी मानले.

नागरिकांना पोलिसांकडून अनेक अपेक्षा असतात. परंतु पोलिस दलाकडून आपण नेहमी घेत असतो मात्र आज त्यांना काहीतरी देण्याची वेळ आली आहे. डीपीडीसीतून पोलिस दलाला १४ नवीन वाहने मिळाली आहे. अजून पुढील काळात आणखी १५ वाहने व ७० मोटारयासकल त्यांना दिल्या जाणार असून पोलिस दलातील कार्यक्षमता नक्कीच वाढणार आहे. भविष्यात  देखील अशाच प्रकारे काम करुन कुठेही गाजावाजा न करता काम करणार असल्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यावेळी म्हणाले.

https://www.facebook.com/508992935887325/videos/263149055481444

https://www.facebook.com/508992935887325/videos/225545072686964

Protected Content