कामाच्या दबावातून क्रेडीट मॅनेजरने घेतला गळफास; मयूर कॉलनीतील घटना

जळगाव प्रतिनिधी । एका फायनान्स कंपनीत क्रेडीट मॅनेजर म्हणून नोकरीला असलेल्या व्यक्तीने कामाच्या तणावातून राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केल्याचे उघडकीला आले आहे. दरम्यान संबंधित अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही असा पवित्रा नातेवाईकांनी केला आहे. 

सविस्तर माहिती अशी की, प्रदीप धनलाल कापूरे (वय-४५) रा. मयूर कॉलनी, जळगाव हे मुथ्थूट होमफिन इंडीया लिमीटेड येथे १ नोव्हेंबर २०१७ पासून क्रेडीट मॅनेजर म्हणून नोकरीला आहे. गेल्या तीन ते चार वर्षांपासून त्यांच्यावर जळगाव जिल्ह्यासह औरंगाबाद जिल्ह्यातील जबाबदारी देण्यात आली. त्यामुळे ते गोंधळून गेले. या कामाच्या तणावातून त्यांनी सोमवार २१ जून रोजी पहाटे सहा वाजेच्या पुर्वी घरात दोरीने गळफास घेवून आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापुर्वी त्यांनी तीन पानी सुसाईड नोट लिहून ठेवली आहे. 

 

सुसाईड नोटमधील मजकूर

” जळगाव, धुळे जिल्ह्यातील मुथ्थूट होमफीन कंपनीत क्रेडीट मॅनेजर म्हणून नोकरीला असतांना ग्राहकांच्या समस्या, जुने प्रकरणे, नवीन प्रकरणे, त्यांच्या येणाऱ्या त्रृटी, ऑनलाईन वर्क, वसूली आदींसह सर्व कामे मी पाहत आहे. दरम्यान माझ्याकडे औरंगाबाद जिल्ह्याची देखील जबाबदारी आल्यामुळे कामाचा ताण अधिक वाढत आहे. त्यामुळे हा ताण सहन होत नाही. त्यात मॅन पावर कमी आणि कामे जास्त अशी अवस्था झाली आहे. त्यामुळे मी आत्महत्या करीत आहे. माझ्या पश्चात वारस म्हणून सर्व योजनांचा लाभ माझ्या पत्नीला मिळावा यासाठी कंपनीतील अधिकारी व सहकारी यांनी सहकार्य करावे अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.”

आज पहाटे सहा वाजता पत्नी सुचिता ह्या मागच्या घरात गेल्या असता त्यांना पतीने आत्महत्या केल्याचे दिसून आले. पतीचा मृतदेह पाहून त्यांनी हंबरडा फोडला. नातेवाईकांनी मृतदेह उतरवून जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आणण्यात आला आहे. दरम्यान, कंपनीच्या तणावातून आत्महत्या केल्याचा आरोपी नातेवाईकांनी केला आहे. पयत प्रदीप कापूरे यांच्या पश्चात पत्नी सुचिता, मुलगा कुणाल, मुलगी यज्ञा, आई सूमनबाई आणि बहिण रेखा शिंपी असा परिवार आहे. या प्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Protected Content