मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा । राज्यात शिंदे सरकार अस्तित्वात आल्यानंतर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे राज्यपाल नियुक्त विधानपरिषदेवरील १२ आमदारांची यादी नव्याने पाठविण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे.
राज्यात महाविकास आघाडी सरकार अस्तित्वात आल्यानंतर जानेवारी २०२१ मध्ये राज्यपालनियुक्त विधानपरिषदेच्या १२ आमदारांची मुद्त संपली होती. यामुळे मविआच्या वतीने राज्यपालांना १२ नावे पाठविण्यात आली होती. यात माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्यासह राजकीय, सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमधील नावांचा समावेश असल्याचे समोर आले होते. तथापि, राज्यपालांनी ही यादी मंजूर केली नव्हती. या संदर्भातील वाद कोर्टात देखील गेला होता. मात्र न्यायालयाने आपण याबाबत राज्यपालांना निर्देश देऊ शकत नसल्याचे स्पष्ट केले होते. यामुळे १२ आमदारांची यादी अजून देखील प्रलंबीत आहे.
राज्यात कालच एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी अनुक्रमे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर राज्यपालांकडे १२ आमदारांची यादी नव्याने पाठविण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. यात भाजप आणि शिंदे गटाला समसमान म्हणजेच प्रत्येकी ६ जागा मिळण्याची शक्यता आहे. यात भाजपतर्फे सदाभाऊ खोत यांच्यासह अन्य नेत्यांना संधी मिळू शकते. तर एकनाथ शिंदे गटातर्फे शिवसेनेतील माजी आमदार वा खासदारांना गळाला लावण्यासाठी त्यांना आमदारकी देण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही. मंत्रीमंडळ विस्तारानंतर ही यादी नव्याने पाठविण्यात येणार असल्याचे मात्र नक्की मानले जात आहे.