दहावीचा निकाल जाहीर; कोकण अव्वल, यंदाही मुलींचेच वर्चस्व


मुंबई लाईव्ह ट्रेंड्स वृत्तसेवा । महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल आज (मंगळवार, १३ मे २०२५) जाहीर करण्यात आला आहे. मंडळाचे सचिव देविदास कुलाळ यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही माहिती दिली.

यावर्षी राज्याचा दहावीचा निकाल ९४.१० टक्के लागला असून, नेहमीप्रमाणे कोकण विभागाने अव्वल स्थान पटकावले आहे. तर, नागपूर विभागाचा निकाल सर्वात कमी (९०.७८ टक्के) लागला आहे. निकालामध्ये यंदाही मुलींनीच वर्चस्व राखले आहे. उत्तीर्ण झालेल्या मुलींची टक्केवारी ९६.१४ आहे, तर मुलांची टक्केवारी ९२.२१ आहे. म्हणजेच, मुलांपेक्षा ३.८३ टक्क्यांनी अधिक मुली उत्तीर्ण झाल्या आहेत.

विभागीय निकालाची टक्केवारी याप्रमाणे आहेत – पुणे: ९४.८१ टक्के, नागपूर: ९०.७८ टक्के, संभाजीनगर: ९२.८२ टक्के, मुंबई: ९५.८४ टक्के, कोल्हापूर: ९६.७८ टक्के, अमरावती: ९२.९५ टक्के, नाशिक: ९३.०४ टक्के, लातूर: ९२.७७ टक्के, कोकण: ९९.८२ टक्के असा लागला आहे.

यावर्षी राज्यातील नऊ विभागीय मंडळांमधून एकूण १५ लाख ५८ हजार २० नियमित विद्यार्थ्यांनी दहावीच्या परीक्षेसाठी नोंदणी केली होती. त्यापैकी १५ हजार४६ हजार ५७९ विद्यार्थी प्रत्यक्षात परीक्षेस बसले आणि त्यापैकी १४ लाख ५५ हजार ४३३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. नियमित विद्यार्थ्यांची एकूण उत्तीर्णतेची टक्केवारी ९४.१० इतकी आहेत.

खाजगी विद्यार्थ्यांमध्ये २८,५१२ जणांनी नोंदणी केली होती, तर २८,०२० विद्यार्थी परीक्षेला बसले आणि २२,५१८ उत्तीर्ण झाले, ज्यांची टक्केवारी ८०.३६ आहे. पुनर्परीक्षार्थी विद्यार्थ्यांमध्ये २४,३७६ जणांनी नोंदणी केली होती, त्यापैकी २३,९५४ विद्यार्थी परीक्षेला बसले आणि ९,४४८ उत्तीर्ण झाले, त्यांची उत्तीर्णतेची टक्केवारी ३९.४४ आहे.

राज्यातून एकूण १६,१०,१०८ विद्यार्थ्यांनी (नियमित, खाजगी आणि पुनर्परीक्षार्थी मिळून) नोंदणी केली होती, ज्यापैकी १५,९८,५५३ विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट झाले आणि १४,८७,३९९ उत्तीर्ण झाले, ज्यांची एकत्रित उत्तीर्णतेची टक्केवारी ९३.०४ आहे. दिव्यांग विद्यार्थ्यांमध्ये ९,६७३ जणांनी नोंदणी केली होती, त्यापैकी ९,५८५ विद्यार्थी परीक्षेस बसले आणि ८,८४४ उत्तीर्ण झाले, त्यांची उत्तीर्णतेची टक्केवारी ९२.२७ आहे.