नुकसानीचे आठवड्याच्या आत शंभर टक्के पंचनामे पूर्ण करावेत – पालकमंत्री

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  केळी पिक विम्याची मदत प्रलंबित असलेल्या शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई देण्याबरोबरच पूर व अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या केळी व इतर पीक क्षेत्रांची स्थळ पाहणी करून एका आठवड्याच्या आत शंभर टक्के पंचनामे पूर्ण करण्यात यावेत, असे निर्देश पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी जिल्हा प्रशासनास दिले आहेत.

केळी पीक विमा प्रलंबित नुकसान भरपाई, मागील आठवड्यात झालेले नुकसान या विषयावर जिल्ह्यातील विविध सामाजिक संघटना, पदाधिकारी व शेतकऱ्यांनी पालकमंत्र्यांकडे तक्रारी व निवेदने दिली आहेत. यावर पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी सोमवारी , १८ सप्टेंबर रोजी सायंकाळी उशिरापर्यंत जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रविशंकर चलवदे व विमा कंपनींच्या प्रतिनिधींशी चर्चा केली.

मागील आर्थिक वर्षात केळी विमा काढला होता मात्र अद्याप नुकसानी भरपाई न मिळालेल्या शेतकऱ्यांना भरपाई मंजूर करण्याची जबाबदारी विमा कंपनीची आहे. विमा कंपनीने या कामात हलगर्जीपणा करू नये. शेतकऱ्यांना आठवड्याभरात नुकसान भरपाई त्यांच्या बॅंक खात्यात थेट वर्ग करावी.‌ विमा कंपनीच्या कामावर जिल्हाधिकारी व कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी स्वतः लक्ष घालावे. अशा सूचना पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिल्या आहेत.

तापी नदीला आलेला पूर व हतनूर बॅकवॉटरमुळे जिल्ह्यातील रावेर, यावल, मुक्ताईनगर, भुसावळ, जामनेर, बोदवड, चोपडा व जळगाव तालुक्यातील काही भागातील बहुसंख्य शेतकऱ्यांच्या केळी व इतर पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. या भागात महसूल‌ व कृषी यंत्रणा तात्काळ सक्रीय करण्यात यावी. तलाठी व कृषी सहायकांनी मुख्यालय सोडून न जाता एका आठवड्याच्या आत शंभर टक्के पंचनामे पूर्ण करण्याचे आदेश पालकमंत्र्यांनी दिले आहेत.

Protected Content