राज्यस्तरीय स्पर्धेसाठी पहूरच्या १० तायक्वांडो खेळाडूंची निवड 


पहूर ता. जामनेर – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी ।  पहूर येथील शौर्य स्पोर्ट्स अकॅडमीच्या खेळाडूंनी विभागीय शालेय तायक्वांडो स्पर्धेत चमकदार कामगिरी करत एकूण १० सुवर्ण, २ रौप्य आणि १ कांस्य पदकांची कमाई केली आहे. या विजेत्या खेळाडूंपैकी १० जणांची राज्यस्तरीय तायक्वांडो स्पर्धेसाठी निवड झाली असून, त्यामुळं पहूरसह संपूर्ण जामनेर तालुक्यात आनंदाचे वातावरण आहे. ही स्पर्धा १३ ऑक्टोबर ते १७ ऑक्टोबर दरम्यान संभाजीनगर येथे होणार आहे.

क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य पुणे, जिल्हा क्रीडा परिषद पुणे, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय जळगाव आणि जळगाव जिल्हा तायक्वांडो स्पोर्ट्स असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने जळगाव येथील क्रीडा संकुलात विभागीय शालेय तायक्वांडो स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत शौर्य स्पोर्ट्स अकॅडमीच्या खेळाडूंनी अत्यंत शिस्तबद्ध आणि कौशल्यपूर्ण खेळ सादर करत पदकांची लयलूट केली.

सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालय, पहूर कसबे येथील मोहिनी हरिभाऊ राऊत, अभिमन्यू अनिल घोंगडे, भावेश अण्णासाहेब निकम, स्वाती रवींद्र चौधरी आणि महेश्वर संजय धनगर यांनी सुवर्ण पदक पटकावले. इंदिराबाई ललवाणी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, जामनेर पुरा येथील जयश्री रामचंद्र घोंगडे, जागृती रवींद्र चौधरी, हर्षदा ज्ञानवंत उबाळे, यश वासुदेव राऊत आणि सतीश सुनील क्षिरसागर यांनी देखील सुवर्णपदक मिळवले. तसेच वेदांत अनिल क्षिरसागर याने रौप्य पदक तर आ.ग.र. गरुड विद्यालयाचा केविन चौधरी याने रौप्य पदक मिळवले. महावीर पब्लिक स्कूलच्या दिपाली भिवसने हिने कांस्य पदक प्राप्त केले. कार्तिक सोनवणे याने स्पर्धेत उल्लेखनीय सहभाग नोंदवला.

या सर्व यशस्वी खेळाडूंना सावित्रीबाई फुले विद्यालयाचे क्रीडाशिक्षक आणि शौर्य स्पोर्ट्स अकॅडमीचे सचिव तसेच तायक्वांडो प्रशिक्षक हरीभाऊ राऊत, राष्ट्रीय पंच ईश्वर क्षिरसागर, आणि भूषण मगरे यांचे मार्गदर्शन लाभले. खेळाडूंच्या या कामगिरीबद्दल जिल्हा तायक्वांडो स्पोर्ट्स असोसिएशनचे अध्यक्ष गोपाल जोनवाल, सचिव राजेंद्र जंजाळे, सहसचिव श्रीकृष्ण चौधरी, संचालक सुनिल मोरे, शौर्य स्पोर्ट्स अकॅडमीचे अध्यक्ष अरविंद देशमुख, उपाध्यक्ष बाबुराव अण्णा घोंगडे, संचालक ॲड. संजय पाटील, सावित्रीबाई फुले विद्यालयाच्या मुख्याध्यापिका वैशाली घोंगडे, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, खेळाडू आणि पालकांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.

पहूरमधील या खेळाडूंनी जिल्हास्तरावर केलेल्या दमदार कामगिरीमुळे राज्य पातळीवरही त्यांच्याकडून यशाची अपेक्षा आहे. त्यांच्या यशामुळे तालुक्याच्या खेळ क्षेत्राला नवे बळ मिळाले आहे, हे निश्‍चित.