हतनूर धरणाचे पुन्हा 10 दरवाजे उघडले, तापी नदीकाठच्या रहिवाशांना सतर्कतेचा इशारा!


भुसावळ लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | जळगाव जिल्ह्यातील महत्त्वाचे हतनूर धरण सध्या पूर्ण क्षमतेने भरले असून, शनिवारी 28 जून रोजी सकाळी 10 वाजता धरण प्रशासनाने धरणाचे पुन्हा 10 दरवाजे प्रत्येकी 1 मीटरने उघडले आहेत. यामुळे धरणातून 20 हजार 130 क्युसेक्स वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे.

सध्या धरणातील पाण्याची पातळी 211 मीटर असून, एकूण साठा 240.80 दशलक्ष घनमीटर इतका आहे, ज्यामुळे धरण 62.06 टक्के भरले आहे. पाणलोट क्षेत्रात सतत सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे धरणाच्या पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ झाली आहे. आगामी काही दिवसांत पावसाचा जोर वाढण्याची शक्यता असल्याने पाणीपातळीत आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

या पार्श्वभूमीवर, नदीकाठच्या गावांना व रहिवाशांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. नागरिकांना नदीनाल्यांच्या परिसरात न जाण्याचे आवाहन करण्यात आले आहे, तसेच सुरक्षिततेची विशेष काळजी घेण्यास सांगण्यात आले आहे.