एनसीपी, बीजेडीसहीत २६ पक्षांचे १०० टक्के उमेदवार कोट्यधीश

shutterstock 526404799 1 770x433

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात श्रीमंत उमेदवारांच्या यादीत मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांचे चिरंजीव नकुलनाथ सर्वात श्रीमंत उमेदवार ठरले आहेत. काँग्रेसच्या मुंबईतील उमेदवार प्रिया दत्त या आठव्या स्थानी आहेत तर राष्ट्रवादी काँग्रेसचे १०० टक्के उमेदवार कोट्यधीश असल्याचे उघड झाले आहे.

 

‘असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक्स रिफॉर्म्स’ या संस्थेने चौथ्या टप्प्यातील सर्वात श्रीमंत उमेदवारांचा अहवाल सादर केला आहे. त्यात ३०६ म्हणजे ३३ टक्के उमेदवार कोट्यधीश असल्याचे नमूद करण्यात आले आहे. एनसीपी, बीजेडीसहित २६ पक्षांचे १०० टक्के उमेदवार कोट्यधीश असल्याचे उघड झाले आहे. मध्यप्रदेशातील छिंदवाडा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणारे काँग्रेसचे उमेदवार नकुलनाथ यांची संपत्ती ६६० कोटी असल्याचे या अहवालात म्हटले आहे. उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसच्या उमेदवार प्रिया दत्त यांची एकूण संपत्ती ९६ कोटी असून त्या यादीत आठव्या स्थानी आहेत. चौथ्या टप्प्यातील तीन उमेदवारांकडे काहीच संपत्ती नसल्याचेही आढळून आले आहे. राजस्थानच्या झालावाड बारा लोकसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार प्रिन्स कुमार यांच्याकडे अचल संपत्ती नाही. त्यांच्याकडे केवळ ५०० रुपये असल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे. भाजप आणि काँग्रेसचे उमेदवार सर्वात श्रीमंत असून दोन्ही पक्षाच्या ५७ उमेदवारांपैकी ५० उमेदवार कोट्यधीश असल्याचेही या अहवालात स्पष्ट म्हटले आहे.

चौथ्या टप्प्यात ९ राज्यातील ७१ जागांवर मतदान होणार असून ९२८ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यापैकी ३४५ उमेदवार अपक्ष आहेत. या सर्व उमेदवारांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार २१० (२३ टक्के) उमदेवारांवर फौजदारी गुन्हे आहेत. १५८ (१७ टक्के) उमेदवारांवर गंभीर गुन्हे आहेत. एस.एच.एस. पार्टीच्या सर्वाधिक म्हणजे ५७ टक्के उमेदवारांवर गुन्हे असून भाजपच्या ४४ टक्के तर काँग्रेसच्या ३२ टक्के उमेदवारांवर गुन्हे असल्याचे नमूद करण्यात आले आहे. विशेष म्हणजे रामविलास पासवान यांच्या लोजपासहित १८ पक्षांचे १०० टक्के उमेदवार गुन्हेगारी प्रवृत्तीचे असल्याचेही समोर आलं आहे.

९ उमेदवार अशिक्षित :- चौथ्या टप्प्यात रिंगणात असलेले नऊ उमेदवार अशिक्षित असून ३४ उमेदवार शिक्षित आहेत. ४४ उमेदवार इयत्ता ५ वी पास, ९८ उमेदवार ८ वी पास, १२० उमेदवार १० वी पास, १४२ उमेदवार १२ वी पास, २०१ उमेदवार पदवीधर, ७७ व्यावसायिक शिक्षण घेतलेले, १६२ पदव्युत्तर, १४ डॉक्टरेट आणि इतर शिक्षण घेतलेले २५ उमेदवार आहेत.

Add Comment

Protected Content