Home Cities बोदवड दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात ₹५ हजार! ३०४ तालुक्यांसाठी शासनाचा मोठा निर्णय

दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात ₹५ हजार! ३०४ तालुक्यांसाठी शासनाचा मोठा निर्णय

0
13


बोदवड-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज, प्रतिनिधी । महाराष्ट्रातील खरीप हंगाम २०२६ मध्ये दुष्काळ जाहीर झालेल्या ३०४ तालुक्यांतील पात्र शेतकऱ्यांना पीक नुकसानीपोटी प्रत्येकी ५ हजार रुपयांची अग्रिम मदत देण्याबाबत महसूल व आपत्ती व्यवस्थापन विभागाने २७ ऑक्टोबर २०२६ रोजी शासन निर्णय जारी केला आहे. दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा देण्याच्या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला आहे.

शासन निर्णयानुसार, ज्या शेतकऱ्यांच्या पिकांचे ३३ टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झाले आहे, अशा पात्र शेतकऱ्यांना या मदतीचा लाभ मिळणार आहे. मदतीची रक्कम थेट लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे. तसेच, विविध शासकीय योजनांचा लाभ घेताना यापूर्वी ई-केवायसी पूर्ण केलेल्या शेतकऱ्यांना पुन्हा ई-केवायसी करण्याची आवश्यकता राहणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

या मदतीसाठी राज्य आपत्ती प्रतिसाद निधी आणि राज्य शासनाच्या निधीतून आर्थिक तरतूद करण्यात आली आहे. या योजनेसाठी एकूण ७ हजार ५०० कोटी रुपयांची तरतूद केल्याचे शासन निर्णयात नमूद आहे. मदत वाटपाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर लाभार्थ्यांची यादी आणि वितरित केलेल्या मदतीचा तपशील संबंधित जिल्ह्यांच्या अधिकृत संकेतस्थळांवर प्रसिद्ध करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.

पात्र शेतकऱ्यांना मदतीची रक्कम मिळण्यात विलंब होऊ नये, यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी आवश्यक ती कार्यवाही करावी, असे शासनाने निर्देश दिले आहेत. तसेच, मदतीच्या रकमेतून बँकांनी कर्जवसुलीसाठी कोणतीही कपात करू नये, याबाबतही आवश्यक सूचना देण्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

दरम्यान, बोदवड तालुक्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांचे या निर्णयाकडे लक्ष लागले आहे. शासनाने मदतीचा निर्णय जाहीर केला असला, तरी पात्र लाभार्थ्यांच्या खात्यात प्रत्यक्ष रक्कम कधी जमा होणार, याबाबत शेतकऱ्यांमध्ये उत्सुकता आहे. दिवाळीपूर्वी मदत मिळाल्यास आर्थिक अडचणींचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.


Protected Content

Play sound