मुंबई: वृत्तसंस्था । आता नव्याने निश्चित केलेल्या दरानुसार कोरोना चाचण्यांसाठी ९८०, १४०० आणि १८०० रुपये असा कमाल दर आकारणे खासगी प्रयोगशाळांना बंधनकारक करण्यात आले आहे.
कोरोना चाचण्यांना सुरुवातीला ४५०० रुपये आकारण्यात येत होते. ते दर ९८० रुपयांपर्यंत कमी करून सरकारने सामान्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज सांगितले.
चाचण्यांचे दर निश्चित करताना तीन टप्पे करण्यात आले असून प्रयोगशाळेत तपासणी केल्यावर ९८० रुपये दर आकारण्यात येईल. कोविड सेंटर, रुग्णालये, क्वारंटाइन सेंटर मधील प्रयोगशाळा येथून सॅम्पल गोळा करुन तपासणी करण्यासाठी १४०० रुपये तर रुग्णाच्या घरी जाऊन सॅम्पल घेऊन तपासणी करण्यासाठी १८०० रुपये असा कमाल दर आता निश्चित करण्यात आला आहे.
राज्यात कोरोना नियंत्रणासाठी चाचण्यांवर भर देण्यात येत असून प्रती दहा लाख लोकसंख्येमागे ७० हजार चाचण्या केल्या जात आहेत. त्या वाढविण्यासाठी प्रयत्न केला जात आहे. सुधारित दरानुसार रुग्णांकडून पैसे आकारले जावेत यासाठी जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्तांनी दक्षता घ्यावी, असे आवाहन आरोग्यमंत्र्यांनी केले.
आतापर्यंत चारवेळा करोना चाचण्याचे दर कमी करण्यात आले आहेत. आता किमान ९८० रुपयांत खासगी प्रयोगशाळेत चाचणी होणार असल्याने त्याचा दुहेरी फायदा होणार आहे. सदृष्य लक्षणे असलेले अनेक रुग्ण चाचण्यांसाठी पुढे येतील व त्यातून चाचण्यांची संख्या वाढून उपचारांची व्याप्ती वाढवणे शक्य होणार आहे.