८०० सीसीटीव्ही फुटेज तापासूनही ” त्या ” इनोव्हाचा छडा लागेना !

 

मुंबई : वृत्तसंस्था । उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकं असलेली कार आढळून आली होती. सोबतच एक पांढरी इनोव्हा होती. त्या इनोव्हाचं कोडं अजूनही सुटलेलं नाही. पांढऱ्या इनोव्हाची माहिती काढताना ८०० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचं फुटेज तपासलं  मात्र, अद्याप हाती काहीच लागलेलं नाही.

 

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराजवळ गुरुवारी  मध्यरात्री दोनच्या सुमारास अज्ञात व्यक्तींनी स्कॉर्पिओ कार बेवारस अवस्थेत सोडली होती. या कारमध्ये सुमारे अडीच किलो वजनाच्या जिलेटीनच्या कांड्या आढळून आल्यानं सगळ्यांनाच धक्का बसला होता. ‘मुंबई इंडियन्स’ लिहिलेल्या बॅगेत अंबानी कुटुंबीयांना धमकी देणारी चिठ्ठीही सापडली.  स्कॉर्पिओसह इनोव्हा कार सहभागी होती. यापैकी स्कॉर्पियो कार १७ फेब्रुवारीच्या रात्री मुलुंड उड्डाणपुलाजवळून (ऐरोलीकडे जाणाऱ्या मार्गावरील) चोरण्यात आली.  इनोव्हा कारवरील नोंदणी क्रमांक बनावट असल्याचे स्पष्ट झाले होतं.

 

तपास एसीपी नितीन अलकनुरे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.  पोलिसांनी ८०० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेजबरोबर ३० पेक्षा अधिक लोकांचे जबाब नोंदवले असून, आतापर्यंत त्या पांढऱ्या इनोव्हाबद्दल कोणतीही माहिती मिळू शकलेली नाही.

 

पोलिसांनी केलेल्या तपासातून स्कॉर्पियो कार ही ठाण्यात राहणारे ऑटोमोबाइल व्यावसायिक हिरेन मनसुख यांची आहे. टाळेबंदीत ही कार वर्षभर बंद होती. ती दुरुस्त करून विकण्याचा मनसुख यांचा विचार होता. ही कार घेऊन ते १७ फेब्रुवारीला ऑपेरा हाऊस येथे निघाले होते. मात्र स्टेअरिंग जाम झाल्याने त्यांनी ही कार उड्डाणपुलाजवळ सोडली. रात्री परत आले तेव्हा ही कार तेथे नव्हती. त्यांनी विक्रोळी पोलीस ठाण्यात कार चोरीची तक्रार नोंदवली होती.

 

 

 

 

Protected Content