जळगाव, लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | प्रादेशिक पर्यटन विकास योजनेच्या माध्यमातून जळगाव जिल्ह्यातील १० पर्यटन स्थळांच्या विकास करण्यात येणार आहे. यासाठी तब्बल ४० कोटी ८६ लक्ष ९८ हजार रूपयांच्या निधीला मंजुरी मिळाली आहे. हा भरीव निधी पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे मिळाला आहे. याबाबतचा प्रस्ताव पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या निर्देशानुसार मागील महिन्यात जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी पर्यटन विभागाकडे सादर केला होता.
या संदर्भातील माहिती अशी की, पर्यटन आणि सांस्कृतीक विकास मंत्रालयाच्या अंतर्गत प्रादेशक पर्यटन विकास योजनेच्या अंतर्गत पायाभूत सुविधांच्या उभारणीसाठी नाशिक विभागातील विविध कामांना मंजुरी प्रदान करण्यात आली असून याबाबतचा शासन निर्णय म्हणजेच जीआर देखील प्रसिध्द करण्यात आला आहे. यात नाशिक विभागातील कामांसाठी १९७ कोटी २० लक्ष रूपयांची तरतूद करण्यात आलेली असून यातील ५५ कोटी ५ लक्ष ९८ हजार रूपयांच्या निधी संबंधीत जिल्ह्याधिकार्यांना वितरीत करण्यात आलेला आहे.
यामध्ये जळगाव जिल्ह्यातील १० कामांना मंजुरी देण्यात आली आहे. यात जळगाव तालुक्यातील कानळदा येथील प्राचीन कण्वाश्रम परिसरातील विविध कामांसाठी ४ कोटी ९८ लक्ष रूपयांच्या निधीला मान्यता मिळाली असून यातील दीड कोटी रूपयांचा निधी वितरीत करण्यात आलेला आहे. कानळदा येथील कण्वाश्रम आणि ग्रामपंचायत कार्यालयाच्या दरम्यानच्या रस्त्याच्या निर्मितीसाठी ११ लाख ९७ हजार रूपयांच्या निधीला मान्यता मिळाली असून ही संपूर्ण रक्कम सार्वजनीक बांधकाम खात्याकडे वर्ग करण्यात आलेली आहे. याच्या सोबत जळगाव तालुक्यातील पळसोद येथील श्री रामेश्वर मंदिराच्या विकासासाठी ४ कोटी ९८ लक्ष रूपयांच्या निधीला मान्यता मिळाली असून यातील दीड कोटी रूपयांचा निधी वितरीत करण्यात आलेला आहे. जळगाव तालुक्यातीलच तरसोद येथील श्री गणपती मंदिराच्या परिसरात पर्यटन विकासासाठी ४ कोटी ८९ लक्ष रूपयांच्या निधीला मंजुरी मिळाली असून यातील दीड कोटींचा निधी वितरीत करण्यात आलेला आहे. नशिराबाद येथील श्री झिपरू अण्णा महाराज समाधी मंदिर परिसराच्या विकासासाठी २ कोटी १४ लक्ष रूपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून यापैकी ६५ लाखांचा निधी वितरीत करण्यात आलेला आहे.
यासोबत, जामनेर तालुक्यातील गारखेडा येथील जुने शिंगायत शिवार परिसरात वाघूर धरणाच्या बॅकवॉटर परिसरात व्हिला कॉटेचे बांधकाम करण्यासाठी ४ कोटी ९८ लक्ष रूपयांचा निधी मंजूर झाला असून यापैकी दीड कोटींचा निधी वितरीत करण्यात आलेला आहे. गारखेडा येथीलच वाघूर धरण बॅकवॉटर परिसरात हाऊसबोट पुरविण्यासाठी ४ कोटी ९५ लाख रूपयांच्या निधीला मान्यता मिळाली असून यापैकी दीड कोटींचा निधी प्रत्यक्ष वितरीत करण्यात आलेला आहे. गारखेडा येथील ऐतीहासीक श्रीराम मंदिराच्या परिसरात भाविकांचा निवारा उभारण्यासाठी ४ कोटी ८१ लाख रूपयांच्या निधीला मान्यता मिळाली असून यातील १ कोटी ४५ लाख रूपयांचा निधी वितरीत करण्यात आलेला आहे.
चोपडा तालुक्यातील उनपदेव येथील पर्यटनस्थळाचा विकास करण्यासाठी ४ कोटी ८७ लक्ष रूपयांच्या निधीला मान्यता मिळाली असून यातील दीड कोटींचा निधी वितरीत करण्यात आलेला आहे. तर, पारोळा तालुक्यातील बहादरपूर येथील बद्रीनाथ मंदिर परिसराच्या विकासासाठी चार कोटी रूपयांच्या निधीला मान्यता मिळाली असून यातील एक कोटींचा निधी वितरीत करण्यात आलेला आहे. अशा प्रकारे दहा कामांसाठी एकूण ४० कोटी ८६ लक्ष ९८ हजार रूपयांच्या निधीला मान्यता मिळाली असून यातील १२ कोटी २९ लक्ष ९७ हजार रूपयांचा निधी वितरीत करण्यात आला आहे.
या संदर्भात पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील म्हणाले की, जिल्ह्यातील पर्यटन स्थळे आणि तीर्थक्षेत्रांचा विकास व्हावा यासाठी पर्यटन आणि सांस्कृतीक कार्य मंत्रालयाकडे आम्ही सातत्याने पाठपुरावा केल्यामुळे या कामांना मंजुरी मिळाली असून यातील पहिल्या टप्प्याचा निधी देखील मिळाला असून यामुळे संबंधीत क्षेत्रांच्या विकासाचा मार्ग मोकळा झाला आहे. लवकरच जिल्ह्यातील अन्य पर्यटनस्थळे आणि तीर्थक्षेत्रांच्या विकासासाठी देखील निधी मिळविण्याला आमचे प्राधान्य राहणार आहे. या कामी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे आणि नगरविकास मंत्री एकनाथराव शिंदे यांचे आपल्याला विशेष सहकार्य लाभल्याचे ना. पाटील यांनी नमूद केले.