१५ फेब्रुवारीपासून महाविद्यालये गजबजणार

मुंबई : वृत्तसंस्था । कोरोना पार्श्वभूमीवर बंद ठेवण्यात आलेली राज्यातील महाविद्यालये १५ फेब्रुवारीपासून पुन्हा सुरु केली जाणार आहे, अशी महत्त्वपूर्ण घोषणा उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी केली.

काही दिवसांपासून राज्यातील महाविद्यालये पुन्हा सुरु करावी, अशी मागणी विद्यार्थ्यांकडून केली जात होती. याबाबत काही बैठका देखील पार पडल्या. नुकतंच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाविद्यालय सुरु करण्यास परवानगी दिली आहे. येत्या १५ फेब्रुवारीपासून महाविद्यालय सुरु करण्यात येणार आहेत, असे उदय सामंत म्हणाले.

सध्या ५० टक्के विद्यार्थ्यांच्या उपस्थितीमध्ये महाविद्यालय सुरू केले जातील. विद्यार्थ्यांना परीक्षा ऑनलाईन आणि ऑफलाईन देण्याची सूटही देण्यात आली आहे. शाळेत किंवा महाविद्यालयात ७५ टक्के उपस्थिती अनिर्वाय असणे गरजेचे असते. मात्र यंदा कोरोनामुळे ही अट शिथील करण्यात आली आहे. याबाबतचा शासन निर्णयही जारी करण्यात आला आहे.

विद्यार्थ्यांच्या आणि पालकांच्या मागणीनंतर यूजीसीच्या गाईडलाईन्सनुसार येत्या १५ फेब्रुवारीपासून ५० टक्के उपस्थितीमध्ये आम्ही कॉलेज सुरू करत आहोत. महाविद्यालय उशिरा सुरू होणार असल्याने त्याचे परिणाम निकालावर थोड्या प्रमाणात होतील, असेही उदय सामंत यांनी सांगितले.

युजीसीच्या गाईडलाईन्सनुसार राज्य सरकारने महाविद्यालय सुरू करण्यास परवानगी दिली आहे. जे महाविद्यालयात येऊ शकत नाही त्यांना ऑनलाइन क्लासेसचा पर्याय उपलब्ध राहील, अशी माहिती उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली

Protected Content