मुंबई : वृत्तसंस्था| शेतकरी आंदोलनाचा फटका रिलायन्स जिओला बसला असून अज्ञातांनी पंजाबमधील जवळपास 1500 हून अधिक टॉवरची तोडफोड केली आहे रिलायन्स जिओ इन्फोकॉमने पंजाबचे मुख्यमंत्री मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह आणि पोलिस महासंचालकांना पत्र लिहिलंय.
जिओच्या काही टॉवर्सची तोडफोड तर काही टॉवर्सचं वीज कनेक्शन बंद करण्यात आलं आहे. त्यामुळे जीओच्या ग्राहकांना अडचणींचा सामना करावा लागतोय. यावरुन रिलायन्स जिओने पंजाबचे मुख्यमंत्री मुख्यमंत्री अमरिंदर सिंह आणि पोलिस महासंचालकांना पत्र लिहून हस्तक्षेप करण्याची आणि रोखण्याची मागणी केली आहे.
पंजाबमध्ये जिओचे जवळपास नऊ हजार टॉवर्स आहेत. यापैकी अनेक टॉवर्सला वीजपुरवठा करणाऱ्या वायरी अज्ञातांनी कापल्याचे समजते. नव्या कृषी कायद्यामुळे उद्योगपती मुकेश अंबानी आणि गौतम अदानी यांना सर्वाधिक फायदा होईल असा प्रचार आंदोलक शेतकऱ्यांमध्ये केला जात आहे. त्यामुळे पंजाबमध्ये या दोन्ही कंपन्यांना मोठा विरोध होत आहे. त्यामुळे काही शेतकऱ्यांनी रिलायन्स इंडस्ट्रीज आणि अदानी ग्रुप्सच्या वस्तूंवर बहिष्कार टाकण्याचं आवाहनही केलं आहे. याचाच राग मुकेश अंबानी यांच्या जिओ मोबाइल टॉवरवर निघत असून पंजाबच्या अनेक भागात टॉवर बंद पाडण्यासाठी वेगवेगळे प्रकार केले गेले आहेत.
मागील महिन्याभरापासून अधिक काळापासून पंजाब आणि हरयाणामधील हजारो शेतकरी दिल्लीच्या सीमांजवळ आंदोलन करत आहेत. केंद्र सरकारने लागू केलेले कृषी कायदे मागे घ्यावेत अशी या शेतकऱ्यांची मागणी आहे